कोरोनाची लस घेतल्यानंतर केवळ वीसजणांना संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:27 AM2021-04-21T04:27:26+5:302021-04-21T04:27:26+5:30
सांगली : लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग झाल्याची उदाहरणे जिल्ह्यात अत्यल्प आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार अवघ्या वीसजणांना संसर्ग झाला आहे. ...
सांगली : लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग झाल्याची उदाहरणे जिल्ह्यात अत्यल्प आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार अवघ्या वीसजणांना संसर्ग झाला आहे. अर्थात त्यांनी लसीचा एकच डोस घेतला होता.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. १४ फेब्रुवारीपासून दुसरा डोसही सुरू झाला आहे. लस घेतलेल्यांपैकी २० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला; पण त्यांचा दुसरा डोस अद्याप पूर्ण झालेला नव्हता. अर्थात लस घेतल्यानंतरही काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्स यांचे लसीकरण झाले. त्यांपैकी काहीजण कोरोनाबाधित झाले; पण कोरोनातून बरेही झाले. त्यानंतर त्यांनी दुसरा डोसही घेतला. कोरोनाविरुद्धच्या युद्धात लढण्यासाठी ते आता पुन्हा आघाडीवर आहेत.
आजवर सव्वाचार लाख नागरिकांनी लस घेतली आहे, त्या तुलनेत वीसजणांना संसर्ग म्हणजे अत्यंत नगण्य मानला जातो. लस घेतल्यानंतर मृत्यूचे उदाहरण अजिबात नाही. लस घेतलेले कोरोनाबाधित वेगाने बरे झाल्याचा अनुभव आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यात कुचराई करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
कोट
लस घेतली म्हणजे मुक्त संचाराला परवानगी मिळाली असे नव्हे. लस घेतल्यानंतरही पुरेपूर काळजी घेतलीच पाहिजे. लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असा वैद्यकीय अभ्यास आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतर बेफिकिरीही न बाळगता मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग याची दक्षता घेतलीच पाहिजे. लस पूर्णत: सुरक्षित असल्याने ती घेण्यात कुचराई करू नये.
- डॉ. विवेक पाटील, लसीकरण अधिकारी