प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींचा खुलेआम वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:30 AM2021-05-25T04:30:20+5:302021-05-25T04:30:20+5:30
शिरढोण : कवठेमहाकाळ शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातदेखील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्ती ...
शिरढोण : कवठेमहाकाळ शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातदेखील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या घरातील अन्य व्यक्तींना गाव प्रशासनाने होम क्वारंटाईन केले आहेत. मात्र, आपत्ती व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणा यामुळे ते लोक गावात खुलेआम फिरताना दिसत आहेत. अशा व्यक्तींवर कारवाई करण्यातही राजकीय हस्तक्षेप होत आहे.
ग्रामीण भागात लॉकडाऊनला केराची टोपली देत गावचा कारभार सुरळीत चालू आहे. ग्रामीण भागामध्ये वरून दुकाने बंद असेले तरी पाठीमागून सुरू आहेत. ग्राहक आल्यावर तेवढेच दुकानचे शटर उघडून माल दिला जातो. ग्रामीण भागात सर्व दुकाने सुरू आहेत. त्यामुळे कोरोना फैलाव थांबताना दिसत नाही. याला जबाबदार फक्त गावातील प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन समिती आहे, असे मत सामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.
होम क्वारंटाईन केलेली लोक मास्क खिशात, सुरक्षिततेची साधने घरात, असे लोक फिरत आहेत. लोकांचा हा निष्काळजीपणाच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवत आहेत. याच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल ही नागरिकांतून होत आहे. ग्रामीण भागातील राजकीय नेते त्या लोकांवर कारवाई करून मतदारांना नाराज करण्याच्या मन:स्थितीत नाहीत.