सांगलीत पाच ठिकाणी होणार ‘ओपन जिम’
By admin | Published: April 25, 2016 11:29 PM2016-04-25T23:29:03+5:302016-04-26T00:29:52+5:30
जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक : महापालिकेला मिळणार जिल्हा नियोजन समितीतून निधी
सांगली : मुंबईसह इतर मोठ्या शहरात राबविलेली ओपन जिमची संकल्पना आता सांगली शहरात अस्तित्वात येणार आहे. शहरात पाच ठिकाणी ओपन जिमची सूचना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केली आहे. त्याला महापालिकेनेही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच जागांची निश्चिती करून हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला जाईल. या ओपन जिमसाठी जिल्हा नियोजन समितीतून ५० लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे.
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्यासमवेत सोमवारी दुपारी महापौर हारुण शिकलगार, स्थायी समिती सभापती संतोष पाटील, माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी गायकवाड यांनी ओपन जिमची संकल्पना मांडली. मुंबईसह राज्यातील इतर मोठ्या शहरातील उद्यानात ओपन जिमची संकल्पना मूळ धरू लागली आहे. नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी व्यायाम आवश्यक असल्याने हा उपक्रम हाती घेण्यास महापौर शिकलगार व सभापती संतोष पाटील यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. शहरातील आमराई व महावीर उद्यानात ओपन जिम करण्यावर बैठकीत चर्चा झाली. एकूण पाच ठिकाणी हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी ५० लाख रुपये खर्च येईल. हा निधी जिल्हा नियोजन समितीतून देण्याची तयारीही जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सकारात्मक उपक्रमाला साद देत महापालिकेने जागा निश्चितीचे काम हाती घेतले आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक गावे टंचाईचा सामना करीत आहेत. शहरात नागरिकांनाही चार दिवसांपूर्वी पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर शहरातील विहिरीचे पुनरुज्जीवन करून पाण्याचा स्रोत जिवंत ठेवण्याची संकल्पनाही जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली. महापालिकेच्या मालकीच्या विहिरीतील पाण्याचा दैनंदिन वापर व्हावा, अशीच गायकवाड यांची अपेक्षा आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून मदतीचा हात पुढे केला आहे. किमान पाच विहिरीवर सौरऊर्जेवर चालणारे सबमर्सिबल पंप बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी निधी देण्याची तयारी जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शविल्याचे सभापती संतोष पाटील यांनी सांगितले. महापलिकेच्या अंदाजपत्रकात सभापती पाटील यांनी सांगली व कुपवाड या दोन ठिकाणी गॅस दाहिनी बसविण्याची घोषणा केली होती. या दोन्ही गॅस दाहिनीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून निधी दिला जाणार आहे. याशिवाय सांगली बायपास रस्त्यावरील स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेल्या जागेवर गॅस दाहिनीचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी बैठकीत केली आहे. (प्रतिनिधी)
दहा कोटींचा : प्रस्ताव देणार
महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधीची मागणी सभापती पाटील यांनी बैठकीत केली. महापालिकेला २० कोटींचा निधी देण्याचा आग्रहही त्यांनी धरला. पण जिल्हा नियोजन समितीतून किमान दहा कोटी रुपये महापालिकेला मिळणार आहेत. सर्व नगरसेवकांच्या प्रभागातील कामांचा समावेश असलेला प्रस्ताव तयार करून त्याला महासभेची मान्यता घेऊन दहा कोटींचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.