शामरावनगरात खुल्या भूखंडाचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2015 11:14 PM2015-07-01T23:14:20+5:302015-07-02T00:24:22+5:30

नगरसेवकाचा हात : आयुक्तांकडे तक्रार; ताबा घेण्याची मागणी

Open land market in Shamravanavangra | शामरावनगरात खुल्या भूखंडाचा बाजार

शामरावनगरात खुल्या भूखंडाचा बाजार

googlenewsNext

सांगली : शहरातील शामरावनगर गृहनिर्माण सोसायटीतील दहा गुंठ्यांच्या खुल्या भूखंडाची परस्पर विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप दळवी यांनी या भूखंड विक्रीबाबत आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे तक्रार केली आहे. एका नगरसेवकाने या भूखंडाची विक्री केली असून, आठ दिवसात भूखंड पालिकेने ताब्यात न घेतल्यास उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिला.
शामरावनगर गृहनिर्माण सोसायटीत ६२ प्लॉट पाडण्यात आले होते. मंजूर रेखांकनानुसार सोसायटीने दहा गुंठ्याचा खुला भूखंड ठेवला होता. हा भूखंड महापालिकेने ताब्यात घेतलेला नाही, की त्या जागेवर फलकही लावलेला नाही. खुल्या जागेची कब्जेपट्टी ताब्यात घेण्याबाबत व रस्त्याखालील क्षेत्राचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याकामी नोटीसही बजाविलेली नाही. याचाच फायदा घेत एका नगरसेवकाने २००९ मध्ये या खुल्या भूखंडाची विक्री केली आहे. त्यासाठी महापालिकेच्या दफ्तरी असलेला नकाशाही बदलला आहे. या भूखंडाची किंमत कोटीच्या घरात आहे. याबाबत दळवी यांनी २०१० मध्ये आयुक्तांकडे तक्रार केली होती.
खुल्या जागेवर प्लॉट पाडून ते विकण्यात आले. त्यानंतर गुंठेवारी नियमितीकरणासाठी पालिकेकडे प्रस्ताव देण्यात आला. महापालिकेनेही या प्लॉटची गुंठेवारी नियमित करून प्रमाणपत्र दिले आहे. या प्रकरणात तत्कालीन आयुक्त दत्तात्रय मेतके यांनी एका मानधनावरील अभियंत्याला निलंबितही केले होते. त्यानंतरही या प्रकरणाचा छडा लागलेला नाही. संबंधित नगरसेवकाच्या दबावामुळे प्रशासन कार्यवाही करीत नसल्याचा आरोपही दळवी यांनी केला.
याबाबत आठ दिवसात या खुल्या जागेवरील गुंठेवारी प्रमाणपत्र रद्द करून, रेखांकन तयार करणाऱ्या अभियंत्यांचा परवाना निलंबित करावा, तसेच ही जागा पालिकेने ताब्यात घ्यावी, अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही दळवी यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)


गुंठेवारी प्रमाणपत्रे दिली
महापालिकेने खुल्या भूखंडावरील प्लॉटधारकांना गुंठेवारी नियमितीअंतर्गत प्रमाणपत्रे दिली आहेत. सध्या या भूखंडावर दोन गुंठ्यात बांधकाम झाले आहे. उर्वरित जागा अद्याप रिकामी आहे. महापालिकेने गुंठेवारी प्रमाणपत्र रद्द करून जागेचा ताब्या घेण्याची मागणी दळवी यांनी आयुक्तांकडे केली.

Web Title: Open land market in Shamravanavangra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.