मदनभाऊंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा
By admin | Published: November 15, 2015 01:06 AM2015-11-15T01:06:53+5:302015-11-15T01:11:26+5:30
बांधकाम विभागाची मंजुरी : महापालिकेला दिलासा, लवकरच काम सुरू होणार
सांगली : महापालिकेच्यावतीने माधवनगर रस्त्यावरील त्रिकोणी भूखंडावर मदनभाऊ पाटील यांचा पुतळा व उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला होता. पण हा भूखंड राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याला हरकत घेतली होती. अखेर काही अटींवर पुतळा व उद्यान उभारण्यास बांधकाम विभागाने मान्यता दिल्याने, मदनभाऊंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे.
तत्कालीन सांगली नगरपालिका व आताच्या महापालिकेवर गेली ३५ वर्षे एकहाती सत्ता गाजविणाऱ्या मदन पाटील यांचे आॅक्टोबर महिन्यात निधन झाले. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी मदनभाऊंचे स्मारक, पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. तसा ठरावही २ नोव्हेंबरच्या महासभेत करण्यात आला आहे. वसंतदादा स्फूर्तिस्थळावर समाधी व माधवनगर रस्त्यावरील त्रिकोणी भूखंडावर पुतळा व उद्यान उभारण्यात येणार आहे.
मदनभाऊंच्या पुतळ्याचे काम मिरजेतील प्रसिद्ध शिल्पकार विजय गुजर यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याचदरम्यान त्रिकोणी भूखंडावर पुतळा उभारण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने आक्षेप घेतला होता. पण ही जागा महापालिकेच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बांधकाम विभागाने नरमाईचे धोरण घेतले.
माधवनगर रस्त्यावरील हा भूखंड मालेगाव, विटा, तासगाव-सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वर आहे. या रस्त्याची हद्द ३०.४८ मीटर इतकी आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने काही अटी घालून महापालिकेला पुतळा व उद्यान उभारण्यास परवानगी दिली आहे.
यात रस्त्याच्या मध्यापासून २१.२४ मीटर अंतर सोडून पथकिनारवर्ती नियमांचे पालन करण्याचे बंधनही महापालिकेवर घालण्यात आले आहे. तसेच पुतळा व उद्यानात प्रवेश करण्यासाठी राष्ट्रीय मार्गाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. दक्षिण बाजूकडील जुन्या रस्त्यावरून प्रवेश करण्याची व वाहन पार्किंगची व्यवस्था स्वत:च्या जागेत करण्याची अटही बांधकाम विभागाने घातली आहे. अडथळे दूर झाल्याने काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)
२ डिसेंबरला उदघाटन
मदनभाऊ पाटील यांची २ डिसेंबर रोजी जयंती आहे. यादिवशी महापालिकेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन व उद्यानाच्या कामाच्या प्रारंभासह समाधीचे लोकार्पण केले जाणार आहे. कुपवाड येथील प्रभाग कार्यालयाचे कामही वेगाने सुरू आहे. तेथील सभागृहाला मदनभाऊंचे नाव दिले जाणार आहे. त्यासाठी राज्यस्तरावरील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.