सांगलीत खुल्या मैदानात भाजीबाजार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:27 AM2021-04-24T04:27:44+5:302021-04-24T04:27:44+5:30
सांगली : सांगली व कुपवाड या दोन शहरात खुल्या मैदानात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत भाजीबाजार भरत आहे. या बाजारातही ...
सांगली : सांगली व कुपवाड या दोन शहरात खुल्या मैदानात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत भाजीबाजार भरत आहे. या बाजारातही सकाळी खरेदीसाठी गर्दी होत आहे. भाजी मंडई बंद झाल्याने नागरिकांना आता याच बाजाराचा आधार उरला आहे.
जनसेवा भाजीपाला संघटना व पृथ्वीराज पवार यांच्या नियोजनातून शहरात चार ते पाच ठिकाणी खुल्या मैदानात भाजीपाला बाजार सुरू आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता महापालिकेने रस्त्यावरील भाजीबाजार बंद केला आहे. शिवाजी मंडईतील होलसेल विक्रीही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जनसेवा संघटनेचे शंभोराज काटकर यांनी प्रशासनाकडे खुल्या मैदानात कोरोना नियमांचे पालन करून भाजीबाजार भरविण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. त्याला प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार जिल्हा परिषदेसमोरील क्रीडांगण, ८० फुटी रस्ता, संजयनगरमधील आनंद पार्क व कुपवाडमधील पाण्याच्या टाकीशेजारील मोकळ्या जागेत भाजी बाजार सुरू आहे. पृथ्वीराज पवार यांच्या प्रयत्नातून सरकारी घाटावर भाजीपाला विक्री केली जात आहे. भाजी विक्रेत्यांकडूनही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जात आहे.
चौकट
डाॅ. आंबेडकर क्रीडांगणावर जागा द्यावी
खुल्या मैदानावर भाजी विक्रीला मान्यता दिली असली तरी अनेक ठिकाणी प्रतिसाद अत्यल्प आहे. त्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर सकाळच्या टप्प्यात भाजीपाला बाजारासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शंभोराज काटकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.