शिराळा-औंढी रस्ता झाला बारा वर्षांनंतर खुला
By Admin | Published: June 9, 2016 01:10 AM2016-06-09T01:10:21+5:302016-06-09T01:15:01+5:30
शेतकऱ्यांचा विरोध : पेढे वाटून आनंद साजरा; मोजणी करून पोलिस बंदोबस्तात मार्ग केला मोकळा
शिराळा : शिराळा-औंढी (शिवणी) या जुन्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून बुधवारी हा रस्ता पूर्णपणे खुला झाला. रस्त्याला विरोध दर्शविल्याने जवळजवळ १०-१२ वर्षे प्रलंबित असलेला या रस्त्याचा प्रश्न बुधवारी मार्गी लागला. यानिमित्त या विभागातील नागरिकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. या रस्त्याबाबत ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठविला होता.
हा रस्ता शिराळा-शिवणी हद्दीमधून आहे. अनेक शेतकऱ्यांनी या रस्त्यावर अतिक्रमण केल्याने, हा पाणंद रस्ता पुन्हा खुला करावा, तसेच अतिक्रमण काढावे, अशी मागणी जवळजवळ १०-१२ वर्षांपूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर याबाबत वारंवार काही शेतकऱ्यांनी विरोध केल्याने, तसेच न्यायालयात गेल्याने हे अतिक्रमण निघाले नव्हते. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अतिक्रमण काढावे यासाठी तत्कालीन तहसीलदार दीपक वजाळे यांनी २८ फेब्रुवारी २०१६ रोजी तीन जेसीबींसह पोलिस बंदोबस्तात भूमी अभिलेख अधिकारी यांच्यासह रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरवात केली.
यावेळी जवळजवळ ४ ते ५ तास विरोध मावळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यावेळी ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते व विरोध दर्शविला होता, त्यांनी रस्ता करण्यास परवानगी दिली. मात्र ज्या शेतकऱ्यांनी हा रस्ता हवा, अशी मागणी केली होती, त्या अर्जदारांपैकी एकाने आपले अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविल्याने हे काम थांबले होते.
जिल्हाधिकारी गायकवाड यांनी याबाबत कडक धोरण अवलंबले. या रस्त्यावरील अतिक्रमण काढावे यासाठी सध्याचे तहसीलदार विमलकुमार यादव, प्रांताधिकारी जाधव यांनी कल्पना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता आज पूर्णपणे खुला झाला. तहसीलदार यादव यांनी या रस्त्याबाबत मोजणी करुन पोलिस बंदोबस्तासह हा रस्ता पूर्णपणे खुला केला. हा रस्ता पूर्ण खुला झाल्याने येथील अनेक नागरिकांना, शेतकऱ्यांना सोयीचे झाले आहे.
आज येथील शेतकरीवर्गाने आनंदोत्सव साजरा केला. यावेळी तहसीलदार शीतलकुमार यादव, मंडल अधिकारी अनंता भानुसे, सुभाष पाटील, प्रमोद पवार या अधिकाऱ्यांसह आनंदराव यादव, पी. जी. शिंदे, महादेव गायकवाड, एस. के. खबाले, सागर शिंदे, अशोक शिंदे शिवाजी गायकवाड दिलीप शिंदे, प्रतापराव गायकवाड, प्रकाश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य राजश्री गायकवाड, सुनीता शिंदे, सुलोचना शिंदे, अरुणा शिंदे, अक्काताई शिंदे, राजाक्का गायकवाड, रुक्मिणी देसाई यांच्यासह अनेक शेतकरी, महिला उपस्थित होत्या.
यावेळी या ग्रामस्थांनी पेढे, साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. तब्बल बारा वर्षानंतर हा रस्ता खुला झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)
चार रस्ते महिन्यात झाले खुले
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार विमलकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शिराळा-औंढी, कणदूर, पावलेवाडी, कोकरुड (उंबरवाडी) हे चार पाणंद रस्ते या महिन्यात खुले झाले.
या शिराळा-औंढी रस्त्यामुळे १११ शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
१.५ कि.मी. लांबी व ४० फूट रुंदीचा हा रस्ता आहे.