कारभार मोकाट; कारभारी सैराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2016 12:20 AM2016-05-08T00:20:17+5:302016-05-08T00:20:17+5:30
तासगाव हल्ला प्रकरण घटनेचा गुलदस्ता : राजकीय रंग; सत्य उघडकीस आणण्याचे आव्हान
दत्ता पाटील ल्ल तासगाव
ठेकेदारी करून स्वत:च्या पोतड्या भरायचा उद्योग तासगावातील काही कारभारी वर्षानुवर्षे करत आहेत. सत्ता कोणाचीही असली, तरी कारभार आमचाच, या अविर्भावात असणाऱ्या ठेकेदार कारभाऱ्यांकडून निविदा दाखल करण्यासाठी दबावतंत्राचा वापर करण्यात आला. यानिमित्ताने ठेकेदार कारभारी लालसेपोटी सैराट झाल्याचे स्पष्ट झाले.
मोकाट कारभाराला लगाम घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या घरावर हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला. हा हल्ला आणि पालिकेतील कारभाऱ्यांचे काही कनेक्शन असल्याचे अद्याप तरी उघडकीस आले नाही. मात्र तसा राजकीय रंग काही नेत्यांकडून दिला गेला असला तरी, नेमके सत्य अद्याप गुलदस्त्यातच आहे. ते चव्हाट्यावर आणण्याचे आव्हान पोलिस प्रशासनावर असले तरी, ठेकेदार ‘कारभारी सैराट झालं जी. .’ असंच म्हणण्याची वेळ आली आहे.
नातेवाईकांच्या, मर्जीतल्या ठेकेदारांच्या नावावर ठेके घ्यायचे. ठेका घेणे शक्य नसेल, तर टक्का घ्यायचा आणि विकासकामांचा दिंंढोरा पिटायचा उद्योग वर्षानुवर्षे पालिकेच्या कारभारात सुरु आहे. पालिकेतील ठेकेदारीच्या मोकाट कारभाऱ्यांच्या अतिमहत्त्वाकांक्षेला आवर घालण्याचा प्रयत्न झाला, तर कारभारी कसे सैराट होऊ शकतात, याचे प्रत्यंतर दोन दिवसांच्या घडामोडीतून पहायला मिळत आहे. सुमारे पावणेतीन कोटींच्या ३९ विकासकामांच्या निविदा २८ तारखेला प्रभारी नगराध्यक्षा सारिका कांबळे यांच्या सहीने जाहीर करण्यात आल्या होत्या. या निविदा दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे झाली होती. या मुदतवाढीला काही नगरसेवकांनी विरोध केल्याने ही प्रक्रिया बारगळली. त्यानंतर ठेकेदारीत इंटरेस्ट असणाऱ्या कारभाऱ्यांनी एकत्रित येऊन कोणत्या ठेकेदाराने कोणत्या कामाची निविदा दाखल करायची, याचे नियोजन एका बैठकीत केले. मात्र नियोजनाप्रमाणे काही नगरसेवकांच्या मर्जीतील निविदा वेळेत दाखल होऊ शकल्या नाहीत. ठेका मिळणार नसल्याच्या भावनेतून सैराट झालेल्या कारभाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांवर मुदतवाढीसाठी दबावतंत्राचा वापर केला.
दबावतंत्राच्या घटनेदिवशीच रात्री मुख्याधिकाऱ्यांच्या घरावर हल्ला करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून झाला. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध झाला. राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला. या घटनेला राजकीय रंग मिळाला. सत्य काहीही असले तरी, पालिकेतील काही कारभारी ठेकदारीतून सैराट झाले आहेत, हे उघड सत्य आहे.
गुलदस्ता उघडण्याचे आव्हान
पोलिस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी कसब वापरुन प्रशासकीय यंत्रणेवर झालेल्या हल्ल्याचा बारा तासात छडा लावला. हल्लेखोर जेरबंद केले. मात्र हल्लेखोर सापडल्याने तपास संपला नाही, तर खरा तपास इथुनच सुरु झाला आहे. एखाद्या अधिकाऱ्यांच्या घरावर, कुटुंबिंयावर हल्ला होण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना आहे. या घटनेचा छडा लागला आहे. मात्र नेमके सत्य काय? याचा गुलदस्ता कायम आहे.
चर्चा हल्लेखोरांच्या संबंधाची
मुख्याधिकाऱ्यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या चार हल्लेखोरांना पोलिसांनी मोठे कसब वापरुन ताब्यात घेतले. पोलिसांची ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र जेरबंद झालेले हल्लेखोर हे पालिकेतील काही कारभाऱ्यांशी संबंधित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे या हल्लेखोरांचे कोणाशी राजकीय कनेक्शन आहे? हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे. याउलट हल्ला केलेले नेमके हल्लेखोर कोण हेच आहेत का? याची कुजबुज पालिकेच्या आवारात सुरु आहे. तर हल्ला होण्याच्या काही काळ आधी मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ असणाऱ्या पालिकेतील कर्मचाऱ्याने हल्लेखारांना ओळखता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यावर कोणी दबाव आणला का? याचीही चर्चा सुरु आहे.