इस्लामपुरातील विरोधक दोन बिन कामाचे; चार मॅनेज
By admin | Published: March 13, 2016 11:23 PM2016-03-13T23:23:45+5:302016-03-14T00:04:26+5:30
भूमिकेबाबत संभ्रम : एमआयएमच्या शाकीर तांबोळींचा फुसका बार
अशोक पाटील -- इस्लामपूर इस्लामपूर शहरात पालिकेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. हे काम वेगाने व्हावे म्हणून एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी पत्रकबाजी करून पालिकेतील राष्ट्रवादीविरोधात असणाऱ्या नगरसेवकांना कुचकामी ठरवले आहे. त्यांनी आपल्या पत्रात कोणाचेही नाव न टाकता दोन बिनकामाचे अन् चार मॅनेज असा उल्लेख करून विरोधकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु हा त्यांचा आरोप म्हणजे फुसका बार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी केला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल २०१६ रोजी १२५ वी जयंती साजरी होत आहे. बाबासाहेबांचे कार्य, त्यांचे विचार तळागाळात पोहोचण्याच्या दृष्टीने केंद्र शासनानेही शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालयांत डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचे आदेश दिले आहेत.
परंतु या महापुरुषाचा विसर इस्लामपूर येथील सत्ताधारी राष्ट्रवादीला पडला आहे. येथे गेल्या ३ वर्षांपासून सुरू असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. बहुतांशवेळा हे कामच बंद असते. याविरोधात विविध दलित संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केली. विरोधी पक्षांनीही आवाज उठविला. दलितांना सोबत घेऊन एमआयएमने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. परंतु सत्ताधाऱ्यांनी त्याची कसलीही दखल घेतलेली नाही.
दरम्यान, शाकीर तांबोळी यांनी काढलेल्या पत्रकात सत्ताधाऱ्यांना सौम्य भाषेत टार्गेट करून, विरोधकांचे मात्र वाभाडे काढले आहेत. त्यांनी स्पष्टपणे पत्रकात म्हटले आहे की, विरोधकांची ताकद तोकडी आहे. विरोधकांपैकी दोन विरोधक आपले कर्तव्य विसरून (संघर्ष करण्याचे) आपल्या कामातच मग्न आहेत. दोन प्रामाणिकपणे काम करीत आहेत. परंतु त्यांची ताकद अपुरी पडत आहेत, तर इतर चार मॅनेज आहेत. सत्तेच्या धुंदीतील सत्ताधाऱ्यांना कुणाची काहीच पर्वा नाही, असे म्हटले आहे. वास्तविक तांबोळी यांनी कोणचेही नाव न घेता हे केलेले आरोप बिनबुडाचे आणि फुसके असल्याचा टोला विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी लगावला आहे. याबाबत शाकीर तांबोळी यांच्याशी संपर्क साधला असता, पत्रकातील गोपनीयता तुम्ही समजून घ्या, पालिका निवडणूक अजून लांब आहे, असे म्हणून त्यांनी बोलणे टाळले.
तांबोळी सत्ताधारी की विरोधक ? : विजय कुंभार यांचा सवाल
नगरसेवक तांबोळी हे गेल्या ३0 वर्षाहून अधिक काळ सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीच्या विरोधात आहेत, की सर्वपक्षीय एकत्र असलेल्या विरोधकांच्या बाजूने, हेच समजत नाही. आता तरी त्यांनी आपली नेमकी भूमिका स्पष्ट करुन मैदानात उतरावे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी व्यक्त केली.