प्रादेशिक पाणीपट्टी वाढीला सदस्यांचा विरोध
By Admin | Published: March 15, 2017 11:50 PM2017-03-15T23:50:03+5:302017-03-15T23:50:03+5:30
जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा : कर्जमाफीची मागणी; म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरणावरून प्रशासन धारेवर
सांगली : जिल्हा परिषदेच्या प्रादेशिक नळपाणी योजना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने मांडण्यात आलेला १७०० रुपये पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सदस्यांनी बुधवारी फेटाळला. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. म्हैसाळ येथील स्त्री भ्रूणहत्या प्रकरणाकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याबद्दल सदस्यांनी सभेत त्यांचा निषेध केला.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्षा स्नेहल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष रणजित पाटील, सभापती भाऊसाहेब पाटील, संजीवकुमार सावंत, सुनंदा पाटील, कुसूम मोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, प्रकल्प संचालक अजयकुमार माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या बारा प्रादेशिक नळपाणी योजना आहेत. योजनेतून वगळलेल्या गावांची थकबाकी ५ कोटीवर गेली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या थकबाकीमुळे योजना चालविणे मुश्किल होत आहे. पाणीपट्टी न वाढविल्यास शासनाकडून दिले जाणारे प्रोत्साहन अनुदान मिळणार नाही. या कारणांनी प्रादेशिक योजनांची पाणीपट्टी वार्षिक १८०० रूपयांवरून ३५०० रूपये करण्याचा ठराव मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भोसले यांनी मांडला. थकबाकी वसुलीसाठी गटविकास अधिकाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. कर्मचारी पगार, वेतन, भत्त्यांसाठी दोन कोटी रुपये लागतात. योजनेवरील वसुली ८० ते ८५ टक्के आहे, परंतु १० कोटी खर्च येत आहे. वसुली आणि खर्च यामध्ये मोठी तफावत असल्याने पाणीपट्टी वाढ करण्याची त्यांनी सूचना केली. परंतु, सर्वच सदस्यांनी यास तीव्र विरोध करीत पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव फेटाळला. कल्पना सावंत यांनी, पाणीपट्टी वाढ ही मलमपट्टी असून कायमस्वरुपी उपाययोजना शोधाव्यात, अशा सूचना मांडल्या. छाया खरमाटे यांनी, पाणीपट्टी वाढ चुकीची असल्याचे सांगितले. काँग्रेसचे पक्षप्रतोद सुरेश मोहिते यांनी, प्रशासनाला योग्य वाटत असेल तर निर्णय घेऊ, त्याबाबतचा ठराव पुढील सभागृह कायम करेल, असे सांगितले. परंतु अध्यक्षा पाटील यांच्यासह सदस्यांनी विरोध दर्शविला. बसवराज पाटील, जयश्री पाटील यांनीही पाच वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
समारोपाच्या सभेत योजना शिंदे, कल्पना सावंत यांना मनोगत व्यक्त करताना अश्रू अनावर झाले. खानापूर पंचायत समितीचा यशवंत पंचायत अभियानात पुणे विभागात प्रथम क्रमांक आल्याबद्दल सभापती वैशाली माळी, सुहास बाबर, गटविकास अधिकारी संतोष जोशी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)