इस्लामपुरात विरोधकांचे स्वार्थी राजकारण

By admin | Published: August 29, 2016 12:21 AM2016-08-29T00:21:41+5:302016-08-29T00:21:41+5:30

जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष : ताळमेळ नसल्याने सत्ताधाऱ्यांपुढे डाळ शिजेना

Opponents of selfish politics in Islampur | इस्लामपुरात विरोधकांचे स्वार्थी राजकारण

इस्लामपुरात विरोधकांचे स्वार्थी राजकारण

Next

अशोक पाटील, इस्लामपूर :इस्लामपूर पालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीची ३० वर्षे सत्ता आहे. त्यांच्याविरोधात विविध आघाड्या निर्माण झाल्या आहेत. परंतु राष्ट्रवादीपुढे विरोधकांची डाळ अद्यापही शिजलेली नाही. सध्या विरोधकांकडे खासदार राजू शेट्टी, मंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक आणि महाडिक गटाची ताकद असूनही स्थानिक पातळीवरील विरोधक स्वार्थी राजकारण करत आहेत. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाचे काहीही देणे-घेणे नाही.
केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. याशिवाय १ खासदार, १ मंत्री आणि १ आमदार आणि पेठनाक्यावरील महाडिक युवा शक्तीची ताकद आहे. परंतु शहरातील विरोधकांच्यात एकमत नाही. त्यामुळे विरोधकांतील काहींनी सत्ताधाऱ्यांशी अंतर्गत साटेलोटे करुन स्वत:चा स्वार्थ साधण्याचा डाव आखला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब सूर्यवंशी सध्या अज्ञातवासात आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादीने सूर्यवंशी यांचे राजकीय अस्तित्व संपविल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. सूर्यवंशी यांनी निर्माण केलेली महिला गृहनिर्माण संस्थेची जागा पालिकेने आपल्या ताब्यात घेतली आहे. न्यायालयासमोरील एक भूखंड सूर्यवंशी यांनी खरेदी केला होता. या भूखंडावरही सध्या आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यामुळे हा भूखंड सत्ताधाऱ्यांच्याच हितचिंतकांनी आपल्या घशात घातला आहे. त्यामुळे सूर्यवंशी यांच्या सर्व नाड्या आवळल्या गेल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात त्यांनी बेकायदेशीर भूखंडाविरोधात न्यायालयीन लढा सुरू केला होता. परंतु याचे पुढे काय झाले, हे कोणालाच समजले नाही. आता तर सूर्यवंशी अज्ञातवासातच आहेत.
भाजपचे दुसरे नेते विक्रमभाऊ पाटील हे पक्ष पातळीवर विरोधकाची भूमिका बजावत आहेत. राज्य पातळीवर मुंडे घराण्याशी एकनिष्ठ राहून भाजपची ताकद वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. स्वाभिमानी संघटनेला भाजपमध्ये सामील करण्यासाठी विक्रमभाऊ पाटील यांचे मोठे योगदान आहे. परंतु ते सध्या एकाकी लढत आहेत. त्यांच्या पक्षाचे बाबासाहेब सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांची साथ नसल्याने भाजपची ताकद विखुरल्याचे दिसते. बाबासाहेब अज्ञातवासात असले तरी, विजय कुंभार कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीही करताना दिसत नाहीत.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी जिल्हा पातळीवर शिवसेनेची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला असला तरी, इस्लामपूर शहरात त्यांची ताकद म्हणावी अशी दिसत नाही. स्वत: नगरसेवक असूनही त्यांनी स्वत:च्या प्रभागात भरीव काम केल्याचे दिसत नाही. केंद्र व राज्यात भाजप- शिवसेना एकत्रित कार्यरत असले तरी, स्थानिक पातळीवर दोघांची तोंडे वेगळ्या दिशेला आहेत.
महाडिक युवा शक्तीचे राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांनी सर्व विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु महाडिक ही बाह्यशक्ती असल्याचे सांगून शहरातील स्थानिक विरोधक तोंडावर एक आणि माघारी एक बोलताना दिसतात. त्यामुळे महाडिक युवा शक्तीने कपिल ओसवाल, अमित ओसवाल, सतीश महाडिक, जलाल मुल्ला, चेतन शिंदे, सोमनाथ फल्ले यांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक वैभव पवार, त्यांचे बंधू विजय पवार यांनी वेळोवेळी सत्ताधाऱ्यांना कधी रस्त्यावर उतरून, तर कधी कायद्याने विरोध दर्शवला आहे. त्यांना इतर विरोधांची साथ लाभत नाही. एकूणच सत्ताधाऱ्यांविरोधात कार्यरत असलेल्यांची ताकद मोठी असली तरी, विरोधकांमध्ये एकी होत नसल्याने ती तोकडी पडत आहे. याचाच फायदा वर्षानुवर्षे राष्ट्रवादीने उचलला आहे.
आराखड्यात दडलंय काय..!
सत्ताधारी राष्ट्रवादीने स्वबळावर इस्लामपूर शहराचा विकास आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये ५ हजारहून अधिक मालमत्ताधारकांवर अन्याय झाला आहे. तरीही विरोधकांनी याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली नाही. उलट स्वत:चे भूखंड कसे वाचवता येतील, असा स्वार्थीपणा केला. म्हणूनच ‘लोकमत’ने सलग तीन दिवस वृत्तमालिका प्रसिध्द केली होती. परंतु याची साधी दखलही विरोधकांनी घेतली नाही. यावरूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सेटलमेंट असल्याचीच चर्चा नागरिकांतून होताना दिसत आहे.
 

Web Title: Opponents of selfish politics in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.