विरोधकांनी दोनतरी गावं दत्तक घ्यावीत
By admin | Published: May 29, 2017 11:10 PM2017-05-29T23:10:59+5:302017-05-29T23:10:59+5:30
विरोधकांनी दोनतरी गावं दत्तक घ्यावीत
लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड/मलकापूर : ‘गेल्या अडीच वर्षांत आम्ही राज्यासमोरील सर्व प्रश्न सोडविले असा आमचा दावा मुळीच नाही. पण आम्ही मंडळी प्रामाणिकपणे काम करत आहोत हे जनतेला माहीत आहे. म्हणूनच विरोधकांनी कितीही रान उठविण्याचा प्रयत्न केला तरी जनता ही भाजपबरोबरच असल्याचे अनेक निवडणूकीतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे विरोधकांनीही आपली ऊर्जा उगाच वाया न घालविता सकारात्मक दृष्टीने खर्च करावी. एक दोन गावे दत्तक घ्यावीत,’ असा उपरोधीक सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला.
कऱ्हाड तालुक्यातील मलकापूर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर तमाम जनतेचा विश्वास आहे. अन् त्यांच्या नेतृत्वाखालीच या देशाचं भलं होऊ शकते. त्यामुळे विरोधकांच्या टिकेकडे लक्ष देऊ नका. महाराष्ट्रातील यापूर्वीच्या सरकारने शेतीकडे मदत अन् पुर्नवसनच्या पलीकडे कधी बघितलेच नाही. आमचे सरकार मात्र शेतीकडे गुंतवणुकीचे क्षेत्र म्हणून पाहत आहे. २६ हजार कोटी रूपये आम्ही सिंचन योजनांसाठी खर्च करीत आहोत. ठिबक सिंचन योजना प्रभावीपणे राबविल्या जाव्यात म्हणून प्रोत्साहन देत आहोत.
गत पंधरा वर्षांत तत्कालिन सरकारने हे कृष्णा खोरे प्रकल्प मार्गी लावणे अपेक्षीत होते. त्यासाठी कोट्यवधींचा निधी आला पण तो कुठे गेला हे समजायला मार्ग नाही.’
डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे यांचे भाषण झाले. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब घाडगे यांनी आभार मानले.