विरोधकांनी दुष्काळाचे राजकारण बंद करावे
By admin | Published: December 28, 2015 11:54 PM2015-12-28T23:54:19+5:302015-12-29T00:57:23+5:30
शिवाजीराव नाईक : शिराळ्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात टीका
येळापूर : गेल्यावेळी तुम्ही दोघे आमदार असतानाही पेठ एमआयडीसी, चांदोली पर्यटन, कासेगाव पोलीस ठाणे, शिरसी वीजवितरणचा प्रश्न का सोडविला नाही? करुंगलीच्या माळावरील कारखान्याने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले, त्यांनी दुष्काळाचे राजकारण करू नये, असा टोला आमदार शिवाजीराव नाईक यांनी आमदार शिवाजीराव देशमुख व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांना लगावला. ते शिराळा येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
आमदार नाईक म्हणाले, गेल्यावेळी मला जनतेने पुन्हा संधी दिली नाही, तरीही मी जनतेच्या संपर्कात राहून कामे केली. पेठ एमआयडीसी रद्द करावी, अशी या भागातील सर्वांची मागणी होती. त्यांच्याही गटाचे यामध्ये लोक होतेच. मात्र तत्कालीन दोन्ही आमदारांनी दुर्लक्ष केले. गिरजवडे प्रकल्पाच्या मंडळाची मुदत संपल्याने निधी थांबला असून, त्या मंडळाला येत्या काही दिवसात मुदतवाढ मिळून कामे सुरू होतील. मात्र जनतेच्या डोळ्यात धूळ टाकण्याचे काम काँग्रेस, राष्ट्रवादीने थांबवावे.
नाईक म्हणाले, प्रश्नांची सोडवणूक न केल्यानेच जनतेने एकाला नाकारले, तर दुसऱ्या विरोधकांना जनतेने सलग तीन वेळा नाकारले असून, त्यांनी दुष्काळाचे राजकारण थांबवावे. शासनाचे कारखान्याला आलेले अनुदान लाटणाऱ्यांनी त्यावेळी शेतकऱ्यांचा विचार का केला नाही? आपले एकट्याचे काही खरे नाही, असे म्हणत आत दोघे एकत्र आले आहेत. त्यांना मी एकटा तोंड देण्यास खंबीर आहे.
यावेळी जि. प. सदस्य रणधीर नाईक, सुखदेव पाटील, प्रल्हाद पाटील, कुंदाताई पाटील, गजानन पाटील, अर्जुन पाटील, एम. एस. कुंभार, बी. आर. पाटील, शहाजी उत्तम पाटील, डॉ. एस. व्ही. पाटील, मोहन पाटील, एन. डी. लोहार, विजय कांबळे, सुभद्रा आटुगडे, दगडू सावंत, कुमार कडोले, पांडुरंग गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)