इस्लामपुरात बिनविरोध प्रस्तावाचा विरोधकांना झटका
By Admin | Published: July 5, 2016 11:41 PM2016-07-05T23:41:10+5:302016-07-06T00:19:51+5:30
नगरपालिका निवडणूक : प्रस्ताव म्हणजे पोकळ हवा असल्याची विक्रम पाटील यांची टीका
अशोक पाटील -- इस्लामपूर नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी आगामी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. मात्र विरोधकांतील काही नेत्यांना याचा जोर का झटका बसला आहे. पक्षप्रतोद पाटील यांचा प्रस्ताव पोकळ आहे, असा टोला भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना मारला.
सत्ताधारी राष्ट्रवादीच्या ताकदीपुढे विरोधकांची ताकद तोकडी आहे. विरोधकांची मोट निवडणुकीच्या अगोदरच हेलकावे खात आहे. मागीलवेळी राष्ट्रवादीला विरोधकांनी एकत्र येऊन आव्हान दिले होते, परंतु विरोधी गटातील काही उमेदवारांनी स्वार्थ साधण्यासाठी अंतर्गत तडजोडी केल्यामुळे मातब्बरांचे पानिपत झाल्याची चर्चा होती. तेव्हापासून विरोधकांमधील अंतर्गत दरी अधिकच रुंदावत गेली आहे, ती अद्यापही कायम आहे. त्यामुळेच एकवाक्यता नसल्याचे जाणवते. त्याचा फायदा पक्षप्रतोद पाटील यांनी उठवला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. मात्र हा प्रस्ताव विरोधी गटातील काही नगरसेवकांना चांगलाच झोंबला आहे. त्यामुळेच विक्रम पाटील यांनी, पक्षप्रतोदांचा हा प्रस्ताव म्हणजे पोकळ हवा असल्याचा टोला मारला आहे.
इच्छुकांनी आपापल्या प्रभागातील सीमारेषांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. मतांची आकडेवारी आणि विरोधात कोण असेल, याचे तर्क-वितर्क लढवत आर्थिक गणिताचा विचार सुरू केला आहे. आर्थिक तडजोडीतून मतदान करणाऱ्यांचा सात-बारा काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यावरुन किती खर्च येणार, याचाही अंदाज बांधला जात आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची तयारी सत्ताधारी राष्ट्रवादीत आहे. याउलट विरोधकांची स्थिती आहे.