आटपाडीकरांना शुद्ध पाणी मिळू नये, अशी विरोधकांची इच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:31 AM2021-09-24T04:31:01+5:302021-09-24T04:31:01+5:30
आटपाडी : आटपाडी तालुक्याच्या जनतेची तहान भागविण्यासाठी निर्माण केलेली धनगाव योजना राजकीय द्वेषापोटी बंद पडली. विरोधकांना आटपाडी तालुक्यातील जनतेला ...
आटपाडी : आटपाडी तालुक्याच्या जनतेची तहान भागविण्यासाठी निर्माण केलेली धनगाव योजना राजकीय द्वेषापोटी बंद पडली. विरोधकांना आटपाडी तालुक्यातील जनतेला शुद्ध पाणी मिळू नये, हीच इच्छा असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केला.
आटपाडी येथे संत शिरोमणी सावता माळी महाराज मठासमोर सभामंडप कामाचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, आटपाडी तालुक्यातील सर्व जनतेसाठी शुद्ध फिल्टरचे पाणी मिळावे, या शुद्ध हेतूने १११ कोटी रुपये असणारी योजना निर्माण करण्यात आली होती. सध्या या योजनेचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. पंपाची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. भिवघाट येथे शुद्धीकरण यंत्रणा उभा करण्यात आली आहे. मात्र काही लोकांनी राजकीय हेवेदाव्यातून ही योजना अमरसिंह देशमुख यांनी मंजूर करून आणल्यामुळेच हेतूपूर्वक बंद पाडण्यात आली आहे.
ते म्हणाले की, टेंभूचे पाणी आटपाडीला मिळाल्याने आता या योजनेची गरज आहे का? असा सवाल केला जात आहे. मात्र माझ्या आटपाडी तालुक्यातील जनतेला शुद्ध पाणी मिळविण्याचा हक्क आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आटपाडी तालुक्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यावेळी ही योजना मंजूर करत असताना अधिकाऱ्यांनीही असाच प्रश्न विचारला होता. पण मी माझ्या तालुक्याच्या जनतेला शुद्ध पाणी पिण्याचा हक्क असल्याचे ठणकावून सांगत योजना मंजूर करून घेतली होती.