स्थायी समितीत निष्ठावंतांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:49 AM2017-08-29T00:49:32+5:302017-08-29T00:49:32+5:30

Opportunity for loyalists in standing committee | स्थायी समितीत निष्ठावंतांना संधी

स्थायी समितीत निष्ठावंतांना संधी

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या गतवर्षी झालेल्या स्थायी समिती सभापती निवडीत दगाफटका झाल्याने, यंदा सदस्यांची निवड करताना सत्ताधारी काँग्रेसने मोठी खबरदारी घेत सोमवारी निष्ठावंतांनाच संधी दिली. तसेच राष्ट्रवादीकडून नव्या चेहºयांना संधी देण्यात आली आहे.
महापालिकेच्या विशेष महासभेत स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या निवडी झाल्या. महापौर हारूण शिकलगार यांनी सदस्यांची नावे जाहीर केली. यात काँग्रेसकडून रोहिणी पाटील, किशोर लाटणे, मृणाल पाटील, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, धोंडुबाई कलकुटगी व बबीता मेंढे यांची, तर राष्ट्रवादीकडून जुबेर चौधरी व महेंद्र ऊर्फ बाळासाहेब सावंत यांची निवड करण्यात आली.
स्थायी समितीतील आठ सदस्य ३१ आॅगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. यात काँग्रेसचे सहा, तर राष्ट्रवादीच्या दोघांचा समावेश आहे. काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या अधिक होती. गत स्थायी समिती सभापती निवडीवेळी प्रदीप पाटील व निर्मला जगदाळे यांनी बंडखोरी केली होती, तर अतहर नायकवडी यांनी निवडीला गैरहजर राहून राष्ट्रवादीला मदत केली होती. त्यामुळे स्थायी समितीत बहुमत असतानाही सभापतीपद गमाविण्याची वेळ सत्ताधाºयांवर आली होती.
यातून धडा घेत, यंदा केवळ निष्ठावंतांनाच संधी देण्याचा निर्णय काँग्रेस नेतृत्वाने घेतला होता. त्यासाठी रविवारी काँग्रेसचे नेते आमदार पतंगराव कदम व जयश्रीताई पाटील यांच्यात बैठकही झाली होती. सायंकाळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनीही जयश्रीतार्इंची भेट घेऊन सदस्य निवडीबाबत चर्चा केली.
सोमवारी विशेष सभेपूर्वी जयश्रीताई पाटील यांनी गटनेते किशोर जामदार यांच्याकडे सहा सदस्यांची नावे दिली. जामदार यांनी बंद लिफाफ्यातून ही नावे महापौरांकडे सादर केली. या निवडीत पाच नवीन चेहरे आहेत. तर धोंडुबाई कलकुटगी यांना मात्र सलग दुसºयांदा लॉटरी लागली आहे. कदम गटातून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
राष्ट्रवादीच्या दोन जागांसाठी दहाजण इच्छुक होते. गेल्या चार वर्षात कोणतेच पद न मिळालेल्यांना संधी देण्याचा निर्णय आमदार जयंत पाटील यांनी घेतला होता. त्यानुसार बाळासाहेब सावंत व जुबेर चौधरी यांची नावे निश्चित करण्यात आली. त्यानुसार विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनी ही नावे महापौरांकडे दिली. त्यानंतर सभेत महापौरांनी नूतन सदस्यांच्या निवडीची घोषणा केली.
सुरेश आवटींचा सवतासुभा
स्थायी समिती सदस्यपदासाठी निरंजन आवटी यांचे नावही चर्चेत होते. त्यांचे वडील व ज्येष्ठ नगरसेवक सुरेश आवटी यांनी सदस्यपदासाठी डॉ. कदम व जयश्रीताई पाटील यांच्याशी चर्चा केली. काँग्रेस नेत्यांनी निरंजन आवटी यांच्या निवडीबाबत सकारात्मकता दाखविली, पण त्यासाठी काही अटीही घातल्या. पुढील निवडणुकीत आवटी हे काँग्रेसमधूनच लढतील, शिवाय त्यांनी सभापतिपदासाठी आग्रह धरू नये, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले. त्याला सुरेश आवटी यांनी विरोध करीत अटी लादून सदस्यपद नको, असे स्पष्टपणे सुनावले.

Web Title: Opportunity for loyalists in standing committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.