दुकानदारी बंद पडण्याच्या भीतीपोटी कृषी कायद्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:26 AM2020-12-29T04:26:52+5:302020-12-29T04:26:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सर्व जोखडातून मुक्त करणारे कृषी कायदे केले. पहिल्यांदा या ...

Opposition to the Agriculture Act for fear of closing shops | दुकानदारी बंद पडण्याच्या भीतीपोटी कृषी कायद्यास विरोध

दुकानदारी बंद पडण्याच्या भीतीपोटी कृषी कायद्यास विरोध

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सर्व जोखडातून मुक्त करणारे कृषी कायदे केले. पहिल्यांदा या कायद्याच्या अध्यादेशाला मान्यता देणारे राज्य सरकार आपली दुकानदारी बंद पडेल, या भीतीपोटी या कायद्याला विरोध करण्याची दुटप्पी भूमिका घेत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

येथील गांधी चौकात केंद्र सरकारने केलेल्या कृषी विधेयकाच्या समर्थनात काढण्यात आलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, पृथ्वीराज देशमुख, धनंजय महाडिक, अमल महाडिक, समरजितसिंह घाटगे, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात भाजीपाला नियमनमुक्त केला. तसेच शेतकऱ्याचा माल हमीभावापेक्षा कमी दराने कोणी खरेदी केला तर त्याला कारावास करण्याचे विधेयक आणले होते. त्याला कॉँग्रेस-राष्ट्रवादीने विरोध केला. २००६ पासून राज्यात करार शेतीचा कायदा आहे. आतापर्यंत कराराची शेतजमीन अदानी-अंबानी यांनी घेतली का? सध्याच्या राज्यकर्त्यांना मोदी सरकारवर कुठेलच आरोप करता येत नाहीत. त्यामुळे ते जनतेला फसवित आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पंजाबच्या मूठभर शेतकऱ्यांसाठी देशातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता मोदी घेत आहेत. एका बाजूने शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करायचे आणि कायद्याला विरोध करायचा, अशी दुटप्पी भूमिका घेतली जात आहे. ठाकरे सरकार हे स्थगिती सरकार आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले, फडणवीस सरकारने राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मताचा अधिकार दिला होता, तो अधिकार या महाविकास आघाडी सरकारने का दिला नाही? शेतकऱ्यांवर गोळ्या चालवून कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे हात रक्ताने बरबटले आहेत.

माजी आमदार सुरेश हाळवणकर, गोपीचंद पडळकर, सागर खोत यांनीही मनोगत व्यक्त केले. यात्रेचे निमंत्रक राहुल महाडिक यांनी स्वागत केले. नगरसेवक अमित ओसवाल यांनी आभार मानले. यावेळी मकरंद देशपांडे, संग्रामसिंह देशमुख, जिल्हा बॅँकेचे संचालक सी. बी. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, धीरज सूर्यवंशी, नगरसेवक विक्रम पाटील, दीपक शिंदे, कपिल ओसवाल, विजय कुंभार, प्रसाद पाटील उपस्थित होते.

Web Title: Opposition to the Agriculture Act for fear of closing shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.