म्हैसाळ योजना ‘वसंतदादा’कडे देण्यास विरोध
By Admin | Published: June 3, 2016 11:04 PM2016-06-03T23:04:07+5:302016-06-04T00:40:04+5:30
योजना चालवायची होती, तर यापूर्वीच आघाडी शासनाच्या काळात का घेतली नाही?
मिरज : म्हैसाळ योजना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या वसंतदादा साखर कारखान्यास म्हैसाळ योजना चालविण्यास देऊ नये, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व कारखान्याचे माजी संचालक महादेव कोरे यांनी केली आहे. म्हैसाळ योजना चालविण्याची भाषा करणाऱ्या विशाल पाटील यांनी कारखान्याच्या पाणी पुरवठा योजना अगोदर सक्षमपणे चालवाव्यात, असेही कोरे यांनी म्हटले आहे. वसंतदादा साखर कारखान्याने म्हैसाळ योजना चालविण्यास घेण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. वसंतदादा पाटील यांनी स्थापन केलेल्या सहकारी संस्था त्यांच्या वारसांना चालविता आल्या नाहीत. वसंतदादा कारखान्याने शेतकऱ्यांची मागील तीन वर्षातील उसाची बिले व अंतिम बिले शेतकऱ्यांना अद्याप दिली नाहीत. त्यांनी पंधरा टक्के व्याजासह शेतकऱ्यांची बिले द्यावीत, त्यानंतर म्हैसाळ योजना चालविण्याची भाषा करावी. कारखान्याच्या पाणीपुरवठा योजना व्यवस्थित सुरू नाहीत. कारखान्याच्या पाणी योजनेवरील ऊस अन्य कारखान्यांना देणाऱ्या शेतकऱ्यांना तीनपट पाणीपट्टीची आकारणी करण्यात येते. विशाल पाटील यांना दुष्काळी शेतकऱ्यांचा कळवळा नसून राजकीय स्वर्थासाठी म्हैसाळ योजना ताब्यात घेण्याची त्यांची धडपड असल्याचा आरोपही महादेव कोरे यांनी केला आहे. म्हैसाळ योजना चालवायची होती, तर यापूर्वीच आघाडी शासनाच्या काळात का घेतली नाही? योजना ताब्यात घेऊन शेतकऱ्यांची अडवणूक करण्याची शक्यता असल्याने, शासनाने म्हैसाळ योजना वसंतदादा कारखान्याकडे चालविण्यास देऊ नये, अशी मागणी कोरे यांनी केली आहे. (वार्ताहर)