विरोधकांमुळे देशात आंदोलनजीवींची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:49 AM2021-02-18T04:49:53+5:302021-02-18T04:49:53+5:30
सांगली : देशात कायद्यापेक्षा स्वतःला मोठे समजून नुकसान करणार्या ‘आंदोलनजीवीं’ची संख्या वाढते आहे. एल्गार परिषदेपासून शेतकरी आंदोलनापर्यंत नियोजनबध्द ...
सांगली : देशात कायद्यापेक्षा स्वतःला मोठे समजून नुकसान करणार्या ‘आंदोलनजीवीं’ची संख्या वाढते आहे. एल्गार परिषदेपासून शेतकरी आंदोलनापर्यंत नियोजनबध्द आंदोलनाची नीती विरोधकांकडून राबवली जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी सांगलीत केला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माजी कार्यकर्त्यांच्यावतीने तावडे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सांगली अर्बन बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, संजय परमणे उपस्थित होते.
तावडे म्हणाले, केंद्रात भक्कम सरकार असतानाही जाणीवपूर्वक विरोधकांनी आंदोलने सुरू केली. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधकांची आंदोलने नियोजनबध्द सुरू आहेत. एल्गार परिषद, सीएएविरोधातील आंदोलन, शाहिनबाग आणि आताचे शेतकरी आंदोलन असो, कायदे समजून न घेता कायद्यापेक्षा स्वतःला मोठे समजून नुकसान करणाऱ्या आंदोलनजीवींची संख्या वाढते आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा उपयोग राजकारणासाठी केला जात आहे. आम्ही कायद्याच्या चौकटीत आंदोलने केली. मोदींनी शेतकरी आंदोलनाला आंदोलनजीवी म्हटले, तर इतके का झोंबले?शेतकरी आंदोलन संपले असते, तर उद्या हे विरोधक एक लाख कामगारांना घेऊन आंदोलनासाठी बसले असते.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीबाबत ते म्हणाले की, मोदींना श्रेय जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांसाठी आलेला पैसा तृणमूल सरकारच्या तिजोरीत पडून आहे. बंगालमध्ये भ्रष्ट सरकारविरोधात तीव्र भावना आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत ममतादीदींचा निश्चित पराभव होईल. यावेळी संजय धामणगावकर यांनी परिचय करून दिला. विशाल गायकवाड यांनी आभार मानले.
फोटो : १७ शीतल ०२ (सिंगल फोटो)
ओळी :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माजी कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी मंत्री विनोद तावडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मकरंद देशपांडे, संजय परमणे, डॉ. राम लाडे उपस्थित होते.