'आयर्विन'च्या समांतर पुलास व्यापाऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:23 AM2021-03-22T04:23:38+5:302021-03-22T04:23:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आयर्विन पुलाजवळून समांतर पूल उभारून तो कापडपेठेतून कायम करण्यास सांगलीतील व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आयर्विन पुलाजवळून समांतर पूल उभारून तो कापडपेठेतून कायम करण्यास सांगलीतील व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी तक्रार केली असून, येत्या २३ मार्च रोजी सांगलीत या प्रश्नी बैठक होणार आहे.
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शेखर माने यांच्या नेतृत्वाखाली कापड पेठ येथे ही बैठक पार पडली. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार, माजी नगरसेवक हरीदास पाटील, व्यापारी एकता असोसिएशनचे समीर शहा, रणजित जोग, हरिष लालन, रमण सारडा, राहुल आरवाडे, जुबेन शहा, युसुफ जमादार यांच्यासह कापडपेठ, हरभट रोड, सराफ कट्टा, मारुती रोड, बालाजी चौक, मेन रोड येथील व्यापारी उपस्थित होते. व्यापाऱ्यांनी या बैठकीत समांतर पूल व्यापारी पेठांमधून नेण्यास तीव्र विरोध दर्शविला.
संजय बजाज म्हणाले की, आयर्विनचा पर्यायी समांतर पूल व्यापारी पेठेतून जाणार असेल तर तो पेठेला हितकारक नाही. आमदार सुधीर गाडगीळ यांनी एकही दुकान बाधित होणार नाही, असे सांगितले असले तरी भविष्यात कोणताही अधिकारी आला तर तो या रस्त्याचे पुलाच्या रुंदीप्रमाणे रुंदीकरण करणारच आहे. कापडपेठ व मेन रोडच्या रस्ता रुंदीकरणाबाबतचा एक पत्रव्यवहार नुकताच सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका आयुक्तांमध्ये झालेला आहे. त्यामुळे हा पूल झाल्यास व्यापारी पेठा उद्ध्वस्त होतील. शहरांचा विकास करताना नेहमी रिंगरोड करून वाहतूक बाहेरून न्यायची असते. सांगलीत मात्र उलटे घडत आहे. या ठिकाणी शहरातून अवजड वाहतूक नेण्याचे नियोजन सुरू आहे.
चौकट
सांगलीत उद्या बैठक
पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत महापालिकेत उद्या, मंगळवारी आढावा बैठक होणार आहे. यावेळी व्यापाऱ्यांच्या वतीने याप्रकरणी निवेदन देऊन विरोध केला जाणार आहे.
चौकट
आमदारांनी चर्चा करावी
समीर शहा म्हणाले की, या पुलाला विरोध असणाऱ्या आम्हा व्यापाऱ्यांशी आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रत्यक्ष भेटून चर्चा करावी. अधिकाऱ्यांनाही सोबत घ्यावे. आता व भविष्यात कधीही पेठांमधील दुकानांना बाधा पोहोचणार नाही, अशी लेखी हमी द्यावी. आम्ही हे आंदोलन मागे घेऊन पुलाला पाठिंबा देऊ
चौकट
सांगलीवाडी नागरिकांना पूल हवा!
सांगलीवाडीचे हरिदास पाटील म्हणाले की, सांगलीवाडीतील लोकांना हा समांतर पूल हवा आहे, मात्र तो व्यापारी पेठांचे नुकसान करून होणार असेल तर नको आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वीच्या आराखड्यात समांतर पूल टिळक चौकाला जोडला होता. तोच कायम करावा.