इस्लामपूरच्या आराखड्याबाबत विरोधकांत मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2016 11:31 PM2016-03-22T23:31:54+5:302016-03-23T00:47:46+5:30
राजू शेट्टी यांची शुक्रवारी बैठक : राष्ट्रवादीविरोधातील सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार
अशोक पाटील :: इस्लामपूर पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीने शहराचा नियोजित विकास आराखडा अंतिम मंजुरीसाठी शासनदरबारी पाठवला आहे. परंतु त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिलेली नाही. तो मंजूर होण्यासाठी त्यांनी खासदार राजू शेट्टी यांना याप्रश्नी लक्ष घालण्यास सांगितले आहे. त्यामुळे शेट्टी यांनी शुक्रवार, दि. २५ रोजी राष्ट्रवादीविरोधातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. यामध्ये विकास आराखड्यावर मंथन होणार आहे.शहराच्या १९८० नंतरच्या विकास आराखड्याला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. मंजुरीअगोदरच या विकास आराखड्यावर पालिका प्रशासनाने लाखो रुपये उधळले आहेत. आराखडा मंजूर करून तो नगरविकास खात्याकडे अंतिम मंजुरीस पाठविला आहे. परंतु तो रद्द व्हावा म्हणून भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रमभाऊ पाटील व काही विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादीने मंजूर केलेल्या आराखड्यास शासनदरबारी अडथळे येत आहेत. सध्या इस्लामपूर शहरात गुंठेवारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कायदेशीर मार्गाने घर बांधता येत नाही. खरेदीचे व्यवहार ठप्प झाले असून, नोटरी करुन खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत. यामध्ये बहुतांशवेळा फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. एकच जागा अनेकांना विकली जात आहे. अशा व्यवहारामुळे गावगुंड आणि जागांचे दलाल मालमाल झाले आहेत.शुक्रवार, दि. २५ रोजी खा. राजू शेट्टी विरोधकांची बैठक बोलावणार आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल महाडिक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, विक्रम पाटील, वैभव पवार, बाबासाहेब सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते विजय कुंभार, शिवसेनेचे आनंदराव पवार उपस्थित राहणार असून, शेट्टी त्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणार आहेत. विकास आराखड्यासंदर्भात या बैठकीत मंथन होणार असून, त्याचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर होणार आहे. त्यानंतरच इस्लामपूर येथील आराखड्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे विरोधकांतून बोलले जात आहे.
कोण, काय म्हणाले?
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर शहरातील विरोधी नगरसेवकांसह इतर घटकपक्षांना एकत्रित करून बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत आराखड्यासंदर्भात चर्चा होऊन त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल. मुख्यमंत्री फडणवीस आणि शेट्टी यांची आराखड्यासंदर्भात दोन-तीन वेळा बैठक झाली आहे. येणाऱ्या काही महिन्यातच आराखड्याचा प्रश्न मार्गी लागेल.
- भागवत जाधव, प्रवक्ते, स्वाभिमानी
पालिका प्रशासनाच्या पातळीवर नियोजित विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. तो नगरविकास खात्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. तो सध्या नगरविकास खात्याकडे मंजुरीविना पडून आहे. आमचे नेते जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा मंजुरीसाठी प्रयत्न करत आहोत. परंतु अद्यापही त्याला मंजुरी मिळालेली नाही.
- सुभाष सूर्यवंशी,
नगराध्यक्ष, इस्लामपूर.