ऑनलाईन परीक्षेस शिक्षण क्षेत्रातून विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:48 AM2021-03-04T04:48:57+5:302021-03-04T04:48:57+5:30
सांगली : शिवाजी विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा २२ मार्चपासून ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन्ही पर्यायांनी सुरू कराव्यात, अशी शिफारस ...
सांगली : शिवाजी विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा २२ मार्चपासून ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन्ही पर्यायांनी सुरू कराव्यात, अशी शिफारस परीक्षा नियोजन समितीने केली आहे. त्यास सांगली जिल्ह्यातील प्राध्यापक व विद्यार्थी संघटनेने विरोध दर्शविला आहे.
परीक्षा नियोजन समितीच्या अध्यक्षा मेधा गुळवणी यांनी यासंदर्भातील शिफारसी विद्यापीठाकडे सोमवारी सादर केल्या. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ५० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ५० गुणांची प्रश्नपत्रिका असावी, एक तासाची परीक्षा असेल, अशा विविध शिफारसी केल्या आहेत. बहुपर्यायी प्रश्नपत्रिका व ऑनलाईनच्या शिफारसीला सांगली जिल्ह्यातील प्राध्यापक व विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशनचे प्रा. भीमराव धुळूबुळू यांनी सांगितले की, अकाैंटन्सी, संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक्स), अर्थशास्त्र यासारख्या विषयांमध्ये बहुपर्यायी प्रश्नपत्रिका देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा कस कसा लागणार? ऑनलाईन परीक्षेतील कॉपीवर कसे नियंत्रण ठेवणार? त्यामुळे ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी विद्यापीठाने खेळू नये. संघटनेमार्फत आम्ही शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंना आम्ही तातडीने भेटून या शिफारसी न स्वीकारण्याची मागणी करणार आहोत.
दुसरीकडे रिपब्लिकन स्टुडंट युनियननेही या पद्धतीस विरोध केला आहे.
कोट
कोरोनाच्या पूर्वीपासून परीक्षांमध्ये सुरक्षित अंतर ठेवले जाते. एकीकडे अधिवेशनाला परवानगी असताना परीक्षांसाठीच वेगळा नियम का लावला जात आहे? ऑनलाईन परीक्षेत कॉपीची शक्यता असून बहुपर्यायीतून विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. त्यामुळे आमचा यास विरोध आहे.
- अमोल वेटम, महासचिव, रिपब्लिकन स्टुडंट युनियन
कोट
अकाैंटन्सीच्या ज्या प्रश्नांची उत्तरे चार पानांची असतील, त्यांना गाळलेल्या जागेत कसे बसविणार? अर्थशास्त्रातील विषय विश्लेषणाचे विद्यार्थ्यांचे आकलन एका शब्दात कसे ओळखणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळ करू नये. ऑनलाईन व बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेचा पर्याय टाळावा.
- प्रा. संजय कुलकर्णी, मिरज
चौकट
तीन सत्रात परीक्षेचा पर्याय
सुरक्षित अंतराचा नियम पाळण्यासाठी तीन सत्रात तीन वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांसह परीक्षा घेण्याचा पर्याय कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशनने सुचविला आहे.