संजयकाकांवर पक्षांतर्गत विरोधकांनी केली कुरघोडी

By admin | Published: March 21, 2017 11:25 PM2017-03-21T23:25:38+5:302017-03-21T23:25:38+5:30

संग्रामसिंहांच्या नावावरच एकमत : घोरपडेंसह मित्रपक्षांचा काका गटाला विरोध

Opposition parties have defeated Sanjayakak in Kurghadi | संजयकाकांवर पक्षांतर्गत विरोधकांनी केली कुरघोडी

संजयकाकांवर पक्षांतर्गत विरोधकांनी केली कुरघोडी

Next



अशोक डोंबाळे ल्ल सांगली
भाजपमधील अंतर्गत कलह जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी चव्हाट्यावर आला. खासदार संजयकाका पाटील गटाला अध्यक्षपद देण्यास भाजपच्याच नेत्यांचा कडाडून विरोध होता. अजितराव घोरपडेंसह इतरांनी संग्रामसिंह देशमुख असतील तरच पाठिंबा अन्यथा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जाण्याचा इशारा दिला होता. या धुमसत असलेल्या संघर्षाचा उद्रेक झाला. यातूनच डी. के. पाटील आणि शिवाजी डोंगरे यांना अध्यक्षपदापासून दूर रहावे लागले. काकांची अखेरची खेळीही मुख्यमंत्र्यांच्या दूरध्वनीने फोल ठरली. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते गाफील राहिल्यामुळे त्यांचा कोणाशीही यशस्वी समझोता झाला नाही.
जिल्हा परिषदेत भाजपचे २५ सदस्य असून, त्यात जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख गटाचे व आमदार विलासराव जगताप गटाचे प्रत्येकी सहा, खासदार संजयकाका पाटील गटाचे दोन, आमदार सुरेश खाडे गटाचे चार, शिवाजी डोंगरे गटाचे तीन, माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख व गोपीचंद पडळकर गटाचे चार अशी सदस्यसंख्या आहे. पृथ्वीराज देशमुख आणि संजयकाका पाटील गटातील मतभेद जगजाहीर आहेत. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावरून पृथ्वीराजबाबा आणि संजयकाका यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला होता. अखेर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मध्यस्थी करावी लागली होती. दोन्ही नेत्यांचे मनोमीलन झाले असले तरी, मने जुळलीच नसल्याचे दिसत आहे. आटपाडी तालुक्यात गोपीचंद पडळकर आणि संजयकाका गटाचेही फारसे जमत नाही. दोघे नेते कार्यक्रमांतही फारसे एकत्र नसतात. देशमुख आणि पडळकर यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये बऱ्याच दिवसांपासून खदखद आहे. या दोन गटाकडे दहा सदस्यांचे संख्याबळ असल्यामुळे त्यांनी पहिल्यापासूनच संजयकाका गटाला अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यासाठी फिल्डिंग लावली होती. या दोन नेत्यांना भाजपमधील अन्य काका विरोधकांनीही बळ दिले.
शिवाय, भाजपकडे जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत नसल्यामुळे रयत विकास आघाडी चार, शिवसेना तीन आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे दोन अशा नऊ सदस्यांवर अवलंबून रहावे लागणार होते. भाजप सोडून अन्य मित्रपक्षांबरोबरही संजयकाका गटाचे फारसे जमत नसल्यामुळे त्यांनीही त्यांच्या समर्थकांना दूर ठेवण्याची अट घातल्याचे भाजपच्या एका नेत्याने मंगळवारी पत्रकारांना सांगितले. अजितराव घोरपडे यांनी तर संजयकाकांविरोधात उघड भूमिका घेतली आहे. भाजपला काठावरचे बहुमत असल्यामुळे घोरपडेंची दोन मते अत्यंत महत्त्वाची होती.
घोरपडे यांनी, संग्रामसिंहांची उमेदवारी असेल तरच पाठिंबा मिळेल, अशी भूमिका घेतली होती. याला रयत आघाडीच्या काही नेत्यांनीही पाठबळ दिल्यामुळे संजयकाकांचे चुलते आणि डी. के. पाटील यांचे नाव मागे पडले. या कुरघोड्यांमुळे नाराज झालेल्या संजयकाकांचा मिरज पंचायत समिती निवडीचा पॅटर्न जिल्हा परिषदेत आणण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत या पॅटर्नची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत भाजपच्या अन्य नेत्यांनी पोहोचवली. यातूनच डोंगरेंची बंडखोरी थोपविण्यात भाजपला यश आले. डोंगरेंना वर्षानंतर अध्यक्ष करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. दुसऱ्या बाजूला भाजपच्या सर्वच नेत्यांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष अडीच वर्षासाठी असतील, असे जाहीर केल्याने डोंगरे यांना फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाचे काय, असाही प्रश्न चर्चेत आला आहे.

Web Title: Opposition parties have defeated Sanjayakak in Kurghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.