जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात विरोधकांची मुसंडीची तयारी
By admin | Published: April 5, 2017 11:30 PM2017-04-05T23:30:40+5:302017-04-05T23:30:40+5:30
आमदारकीचे वेध : सदाभाऊ खोत, निशिकांत पाटील, राहुल महाडिक चर्चेत
अशोक पाटील ल्ल इस्लामपूर
केंद्र आणि राज्य शासनाच्या ताकदीवर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात विकास कामांचा धडाका लावला आहे. इस्लामपूर शहरासह ग्रामीण भागातील सहकारी संस्थांत राष्ट्रवादीची मक्तेदारी आहे. त्यामुळे आ. पाटील यांचे वर्चस्व अबाधित आहे. तरीसुध्दा सदाभाऊ खोत, पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडिक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत.
सदाभाऊ खोत आणि माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या भेटीनंतर खोत आणि नगराध्यक्ष पाटील यांना आभाळ ठेंगणे झाले आहे. खोत यांनी विकास कामांचा धडाका उडवून दिला आहे. त्यांच्यासोबत निशिकांत पाटील हेही उपस्थित राहत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीला जयंत पाटील यांच्याविरोधात सदाभाऊ हे निशिकांत पाटील यांना ताकद देणार, की स्वत: लढणार, हे निश्चित नाही. त्यातच आमदारकी पदरात पाडून घेण्यासाठी कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घेण्याची तयारी असलेला पेठनाक्यावरील महाडिक गटही तयारीला लागला आहे. पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडिक यावेळी ताकद अजमावणार आहेत. यापूर्वी आमदारकीसाठी नानासाहेब महाडिक यांनी जयंत पाटील यांच्याशी ‘सेटलमेंट’ केली होती. परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली. त्यानंतर कोणत्याही पक्षाशी संबंध न ठेवता महाडिक यांची वाटचाल सुरु आहे.