विरोधकांनी हुरळून जाऊ नये : दमयंतीराजे
By admin | Published: February 24, 2017 11:44 PM2017-02-24T23:44:36+5:302017-02-24T23:44:36+5:30
विरोधकांनी हुरळून जाऊ नये : दमयंतीराजे
सातारा : ‘तालुक्यात गटातील आणि गणातील मिळून एकूण ३० जागांवर लढत होऊन, सातारा विकास आघाडी आणि पुरस्कृत उमेदवार एकूण १४ ठिकाणी निवडून आले आहेत. तर विरोधकांचे एकूण १६ उमेदवार निवडून आलेले आहेत. याचाच अर्थ जनतेने थोड्या फार फरकाने समान कौल दिला आहे. १४ आणि १६ मध्ये संख्यात्मक फार मोठा फरक नाही, त्यामुळे विजयी उमेदवारांनी विकासासाठी संपूर्ण योगदान द्यावे’ असे प्रतिपादन ‘नक्षत्र’च्या संस्थापिका अध्यक्षा दमयंतीराजे भोसले यांनी केले.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दमयंतीराजे भोसले यांनी म्हटले आहे की, ‘सातारा तालुक्यातील जनतेने उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सातारा विकास आघाडी व मित्रपक्ष असे एकूण पाच गटांच्या आणि ९ गणांच्या उमेदवारांना विजयी केले. तर विरोधी उमेदवारांना एकूण पाच गटांत आणि ११ गणांमध्ये विजयी केले आहे. म्हणजेच एकूण ३० जागांपैकी ‘साविआ’ आणि मित्रपक्ष मिळून १४ जागांवर तर विरोधकांनी एकूण १६ जागांवर विजय मिळवला आहे. १४ आणि १६ यामधील आकड्यांमध्ये संख्यात्मक फार मोठा फरक आहे असे नाही, त्यामुळे जनतेने दिलेला कौल हा सातारा विकास आघाडीच्या विरोधात दिला आहे, असा अन्वयार्थ कुणी काढू नये. एक-दोन जागांवर आम्ही कमी पडलो; पण जनेतेने झिडकारले वगैरे असे काहीही नाही. त्यामुळे विरोधकांनीही फार हुरळून न जाता, जनतेने आता संधी दिली आहे तर सगळ्यात चांगले काम करून दाखवणे आवश्यक आहे.
यापुढे दडपशाही, मारामाऱ्या, गोंधळ, सूड उगवणे, खोट्या केसेस या प्रकारांना पायबंद घातला जाणे विरोधकांकडून अपेक्षित आहे. घराण्याला हे प्रकार शोभादायक नाहीत. जनतेचा सर्वांगीण विकास याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून, विकासाची संकल्पना यापुढे राबविली गेली पाहिजे तरच लोकशाही बळकट आणि समृद्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल. असेही दमयंतीराजे यांनी शेवटी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)