पुतळ्यांसाठी विकासकामांचा निधी वापरण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:19 AM2021-07-16T04:19:25+5:302021-07-16T04:19:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्हा परिषदेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह पाच पुतळे उभारण्याचा निर्णय झाला आहे; पण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा परिषदेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह पाच पुतळे उभारण्याचा निर्णय झाला आहे; पण त्यासाठी विकासकामांचा निधी वापरण्यास बांधकाम समितीने विरोध केला आहे. अन्य मार्गांनी त्यासाठी तरतूद करावी, अशी सूचना सदस्यांनी बैठकीत केली.
ध्वजकट्ट्याशेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय प्रारंभी झाला होता, नंतर आणखी चार महापुरुषांचे पुतळे उभारण्याचे ठरले. या प्रकल्पासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. यावर गुरुवारी बांधकामच्या सभेत चर्चा झाली. सभापती जगन्नाथ माळी यांच्यासह सरदार पटेल, अरुण बालटे, अरुण राजमाने, अश्विनी नाईक, अभियंता वृंदा पाटील, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यावेळी उपस्थित होते. सदस्यांनी सांगितले की, पुतळे उभे करण्यास काहीही विरोध नाही; पण त्यासाठी निधीची तरतूद करूनच कामे हाती घ्यावीत. विकासकामांच्या तरतुदीमधून पुतळ्यांसाठी निधी वळता करू नये. पुतळा समितीमध्ये बांधकाम समितीतर्फे सरदार पटेल यांना प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आले.
तासगाव पंचायत समितीमधील गाळे भाडे थकल्याने सील केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. काही जणांनी पोटभाडेकरू ठेवल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आष्टा आणि विटा येथील गाळ्यांकडेही लक्ष देण्याची सूचना बालटे यांनी केली. ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी स्वीय निधीतून तरतूद केल्याने विकासकामांवर परिणाम होत असल्याचे सदस्यांनी सांगितले. मिरज, वाळवा व पलूस तालुक्यांत महापुरात वाहून गेलेल्या रस्त्यांसाठी स्वीय निधीमधून खर्चाला मंजुरी देण्यात आली. मुद्रांक शुल्काचे २४ कोटी, पाणी उपशाचे १४ कोटी, जीवन प्राधिकरणाकडून सात कोटी रुपये जिल्हा परिषदेला येणार आहेत. त्यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी एकत्र प्रयत्न करण्याची सूचना सदस्यांनी केली.
चौकट
सदस्य फक्त चहा-नाश्त्यापुरते?
बांधकामकडील ८० लाख रुपयांचा निधी अन्य कामांसाठी वळता केल्याबद्दल सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सभेला सदस्यांनी फक्त चहा-नाश्त्यापुरते यावे काय? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला. राजमाने म्हणाले की, काही सदस्य बांधकाम समितीला नाहक टार्गेट करत आहेत. निधीचा निर्णय घेताना सदस्यांना विचारात घेतले जात नाही. ही समिती नेमकी कोण चालवत आहे, हे स्पष्ट करावे.