नागपूजेबाबत निवडणुकीनंतर आदेश
By admin | Published: January 29, 2017 11:09 PM2017-01-29T23:09:16+5:302017-01-29T23:09:16+5:30
रावसाहेब दानवे : सागाव येथे उदयसिंह नाईक गटाचा भाजपमध्ये प्रवेश
मांगले : शिराळ्याची जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा आचारसंहिता संपताच अध्यादेश काढून पुन्हा सुरु करण्यात येईल, असे आश्वासन देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकविण्याचे आवाहन केले.
सागाव (ता. शिराळा) येथे पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती उदयसिंह नाईक, शोभाताई नाईक, रणजितसिंह नाईक, अभिजित नाईक, जिल्हा परिषद सदस्या वैशाली नाईक, अॅड. करणसिंह चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
दानवे म्हणाले, भाजप सरकारने पीकविम्याची पध्दत बदलली. खतांच्या किमती पाच वर्षे स्थिर ठेवल्या. दारिद्र्यरेषेतील कुटुंबांना केवळ शंभर रुपयात गॅस सिलिंडर देण्याची योजना सुरु केली आहे. याचा लाभ जनता घेत आहे. राज्यात जलयुक्त शिवार योजना राबवून शेकडो गावे दुष्काळमुक्त केली आहेत. भाजप सरकारने ६८ वर्षे शेतकऱ्यांनी सहन केलेली अन्यायी आणेवारी पध्दत आम्ही एका वर्षात बदलून, ३३ टक्के आणेवारी असणारी गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची योजना आणली. शेतकऱ्यांना दीडपट जादा मदत करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे आम्ही कागदावरचे नाही, तर जातीवंत शेतकरी आहोत.
शिवाजीराव नाईक म्हणाले, शिराळा तालुक्यात वैचारिक क्रांती झाली असून, सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. आगामी सर्व निवडणुकांत भाजपचीच सत्ता येईल.
यावेळी रणजितसिंह नाईक, शोभाताई नाईक यांनी विश्वासराव नाईक यांनी स्थापन केलेल्या साखर कारखान्याच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.
तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील यांनी स्वागत केले. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, नानासाहेब महाडिक, जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, नीता केळकर, गोपीचंद पडळकर, माजी आमदार दिनकर पाटील, निशिकांत पाटील, विक्रम पाटील, प्रल्हाद पाटील, अतुल भोसले, रवी अनासपुरे, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर उपस्थित होते. (वार्ताहर)
खुर्ची आणि संजयकाका...
आमदार शिवाजीराव नाईक यांचे भाषण सुरु असताना खासदार संजय पाटील यांचे आगमन झाले. त्यावेळी त्यांना बसायला खुर्ची नव्हती. संयोजकांनी खुर्ची आणून दिली. ती मध्येच काढून घेत संजयकाका मंत्रीमहोदयांकडे निघाले. त्यावेळी चंद्रकांतदादा व दानवेंनी, ‘खुर्ची ठेवा, इकडे या, इथे शिवाजीरावांची खुर्ची आहे’, असे सांगितले. त्यावेळी ‘नको, खुर्चीच घेऊन येतो’ असे संजयकाका म्हणाले. हे ऐकून शिवाजीराव नाईक यांनी ध्वनिक्षेपकावरूनच, ‘खासदारसाहेब, खुर्ची सोडायची नाही’ अशी जाहीर टिपणी केल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला.
मासे आणि भाजपचे खतरनाक जाळे
सांगली जिल्ह्यात भाजपचा कार्यकर्ता दुर्बिणीतूनसुध्दा सापडत नव्हता, मात्र एक खासदार व चार आमदार गेल्यावेळेस आमच्या फासक्यात सापडले. आमच्या नजरेत भरला तर तो भाजपमध्ये आलाच म्हणून समजा. याचे श्रेय चंद्रकांतदादांना जाते. भाजपचे जाळे खतरनाक असून, त्यामध्ये अनेक मासे आत्तापर्यंत सापडले आहेत, अशी मिश्किलीही रावसाहेब दानवे यांनी केली.