शहरातील त्रिशला कोविड सेंटर बंदचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:20 AM2021-06-01T04:20:53+5:302021-06-01T04:20:53+5:30
सांगली : शहरातील गणेशनगरमधील त्रिशला मल्टिस्पेशालिटी कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश सोमवारी महापालिकेचे आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी दिले. ...
सांगली : शहरातील गणेशनगरमधील त्रिशला मल्टिस्पेशालिटी कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश सोमवारी महापालिकेचे आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी दिले. या कोविड सेंटरबाबत रुग्ण व नातेवाइकांनी जिल्हाधिकारी व महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. या सेंटरमध्ये तज्ज्ञ मनुष्यबळ आणि अपुऱ्या सुविधा असल्याचे कारण देत, महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्रिशला मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड कोविड सेंटरला महापालिकेने मान्यता दिली होती. परंतु या कोविड सेंटरमध्ये अपुऱ्या पायाभूत सुविधा व तज्ज्ञ मनुष्यबळाची कमतरता असल्याचे आढळून आले. शिवाय रुग्ण व नातेवाइकांनीही कोविड सेंटरमधील असुविधांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला कोविड सेंटरची पाहणी करून, कारवाई करण्याची सूचना करण्यात आली होती. आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी त्रिशला डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये कोणतेही नवीन कोविड रुग्ण दाखल करण्यात येऊ नयेत, तसेच सध्या दाखल असलेले कोविड रुग्ण रितसर डिस्चार्ज केल्यानंतर हे कोविड सेंटर बंद करावे, असा आदेश सोमवारी काढला आहे.