कागदपत्रे न दिल्याबद्दल डॉक्टरांनी भरपाई देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:43 AM2020-12-15T04:43:28+5:302020-12-15T04:43:28+5:30
सांगली : रुग्णावर केलेल्या उपचाराची कागदपत्रे व शैक्षणिक अर्हतेबद्दलची कागदपत्रे न दिल्याबद्दल सांगलीतील डॉ. महेश जाधव यांनी ...
सांगली : रुग्णावर केलेल्या उपचाराची कागदपत्रे व शैक्षणिक अर्हतेबद्दलची कागदपत्रे न दिल्याबद्दल सांगलीतील डॉ. महेश जाधव यांनी १५ हजार रुपयांची भरपाई द्यावी, असे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले.
मिरजेच्या सावळी रोडवरील विलास बाबूराव बुर्लीकर यांचा ५ जून २०१९ रोजी अपघात झाला होता. त्यांनी ५ ते १७ जूनपर्यंत डॉ. जाधव यांच्याकडे उपचार घेतले. त्यांचा हात कोपरापासून तुटला होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून तो पुन्हा जोडला. मात्र, काही दिवसांनी त्यांच्या त्या हाताला पुन्हा बाधा झाल्याने तो काढून टाकण्यात आला होता.
त्यानंतर बुर्लीकर यांनी डॉक्टरांकडे उपचाराबाबतची व त्यांच्या शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे मागितली होती. मात्र, डॉक्टरांनी नकार दिल्यानंतर त्यांनी ॲड. प्रदीप जाधव यांच्यामार्फत नोटीस पाठविली होती. तसेच ग्राहक न्यायालयातही तक्रार दाखल केली होती. कागदपत्रे न दिल्याने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांचा भंग केल्यावरून मुकुंद दात्ये यांच्या अध्यक्षतेखालील अशफाक नायकवडी व निलांबरी व्ही. देशमुख यांच्या पीठाने त्यांना १५ हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.