तासगावात लढण्यासाठी नादच केलाय थेट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:24 AM2021-07-26T04:24:21+5:302021-07-26T04:24:21+5:30
दत्ता पाटील तासगाव : तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी गाजावाजा सुरू झाला आहे. युती, आघाडीबाबतचे चित्र अस्पष्ट आहे. मात्र, तासगावच्या राजकारणातील ...
दत्ता पाटील
तासगाव : तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी गाजावाजा सुरू झाला आहे. युती, आघाडीबाबतचे चित्र अस्पष्ट आहे. मात्र, तासगावच्या राजकारणातील शेठ कारभाऱ्यांनी निवडणूक लढण्याचा नादच केला असून, स्वत:च्या नावाचा गाजावाजा सोशल मीडियातून सुरू केला आहे. काहीही झाले तरी रिंगणात उतरायचेच, असा नाद करून सगळेच शेठ तयारीला लागले आहेत. त्यामुळे यंदा तासगावच्या रणांगणात उमेदवारांची भाऊगर्दी दिसणार, हे नक्की आहे.
तासगाव नगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. ‘काका म्हणतील तसं’ या एका वाक्याभोवती तासगाव पालिकेतील कारभार सुरू आहे. त्यामुळे पालिकेची सत्ता दुसऱ्यांदा काबीज करण्यासाठी खासदार समर्थकांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. काकांकडून उमेदवारी मिळणारच, या आर्विभावात भाजपच्या अनेक इच्छुकांनी सोशल मीडियातून दिखावेबाजीला सुरुवात केली आहे.
दुसरीकडे पालिकेत प्रमुख विरोधक म्हणून राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादी राज्याच्या सत्तेत असल्याने इच्छुकांची मांदियाळी मोठी आहे. त्यातच काँग्रेस आणि शिवसेनेनेदेखील शड्डू ठोकला आहे. राज्याच्या धोरणानुसार राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित येणार की नाही, याबाबत अद्याप नेमके चित्र स्पष्ट नाही. प्रभागरचना, आरक्षण निश्चित नाही. मात्र, निवडणुकीचा हंगाम सुरू झाल्याने सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांनी निवडणूक लढवण्यासाठी लंगोटा चढवून शड्डू मारण्यास सुरुवात केली आहे.
आघाडी झाली, नाही झाली तरी आणि पक्षाकडून उमेदवारी मिळाली किंवा नाही मिळाली तरी, यंदा निवडणूक लढवायचीच, अशी हाळी देऊन इच्छुकांचे काम सुरू आहे. नव्या प्रभागरचनेनुसार मर्यादीत मतदारसंख्येचा प्रभाग होणार असल्याने निवडून येण्याची गोळाबेरीज सर्वच इच्छुकांना सोपी दिसत आहे. त्यामुळे पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली, तरी स्वबळावर सहजपणे निवडून येण्याची खात्री अनेकांना वाटत आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीतील अनेक इच्छुकांनी स्वत:च स्वत:च्या नावाला डिमांड आणण्यास सुुरुवात केली आहे.
अलीकडच्या काळात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गाण्याप्रमाणे अनेक इच्छुक स्वत:च स्वत:ला ग्रेट माणूस समजून, वॉर्डात आपलेच नेटवर्क जाम असल्याचा गाजावाजा सुरू केला आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी आतापासूनच ‘निवडणूक लढण्याचा नादच केलाय थेट!’ असे सांगून स्वत:च इच्छुक शेठ म्हणवून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तासगावात इच्छुकांची मोठी मांदियाळी तयार झाली आहे.
चौकट :
भाजप, राष्ट्रवादीची डोकेदुखी
भाजप आणि राष्ट्रवादीत इच्छुकांची संख्या मोठी आहे. नव्या प्रभागरचनेनुसार मर्यादित मतदारांमुळे व्होट बँक असलेल्या कार्यकर्त्यांना डिमांड येणार आहे. त्यामुळे बंडखोरीही मोठ्या प्रमाणात होणार हेदेखील स्पष्ट आहे. त्यामुळे इच्छुकांच्या मांदियाळीमुळे भाजप आणि राष्ट्रवादीची डोकेदुखी होणार आहे.