खटल्यात फितुर झालेल्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:39 AM2021-02-26T04:39:27+5:302021-02-26T04:39:27+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या खटल्यात पीडित मुलाची आई आणि त्याच्या चुलत ...
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या खटल्यात पीडित मुलाची आई आणि त्याच्या चुलत भावाने न्यायालयामध्ये खोटी साक्ष दिल्याने या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी गुरुवारी दिले.
या घटनेसंर्दभात पुष्पक नायकवडी आणि ओंकार पाटील या दोघांविरुद्ध अनैसर्गिक अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि शस्त्र अधिनियम कायद्याखाली पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली होती.
या खटल्याची सुनावणी न्या. मुनघाटे यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडित मुलाची आई आणि त्याचा चुलत भाऊ अशा दोघांनी संशयित आरोपींना वाचविण्यासाठी फितुर होत खोटी साक्ष दिली. ही बाब गंभीर असल्याने न्या. मुनघाटे यांनी दोघांवर कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश दिले. या गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता मुद्दामहून न्यायालयासमोर खोटी साक्ष देणे हादेखील तितकाच गंभीर गुन्हा आहे, त्यामुळे अशा फितुरांवर कायद्याचा वचक राहावा, यासाठी न्यायाधीशांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. फिर्यादीतर्फे सहायक सरकारी वकील अनिल कुलकर्णी यांनी काम पाहिले.