सदनिका रखडल्याने बांधकाम व्यावसायिकाला १९ लाखांच्या भरपाईचा आदेश
By संतोष भिसे | Published: July 30, 2023 02:37 PM2023-07-30T14:37:53+5:302023-07-30T14:37:58+5:30
सांगलीतील ग्राहकाच्या तक्रारीवर ग्राहक मंचाचा निर्णय, अवघ्या १० महिन्यात दावा निकाली
सांगली : पुणेस्थित बांधकाम व्यावसायिकाने ठरलेल्या वेळेत सदनिकेचे बांधकाम पूर्ण करुन दिले नाही म्हणून १९ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले. त्यावर सन २०१९ पासून साडेआठ टक्के व्याजदराने व्याज देण्याचेही आदेश दिले.
सांगलीतील गौतम विठ्ठल लोंढे यांनी यासंदर्भात ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला होता. पुण्यातील संबंधित बांधकाम फर्मने डिसेंबर २०१७ मध्ये कोल्हापुरात व्यावसायिक प्रदर्शनादरम्यान लोंढे यांना सदनिकेची माहिती दिली. पुण्यात लोणीकंद ग्रामपंचायतीच्या हद्दीत ४२८ चौरस फुटांची वन बीएचके सदनिका उपलब्ध असल्याचे सांगितले. वाटाघाटीने एकूण किंमत २० लाख १९ हजार ६२४ रुपये निश्चित झाली. दोहोंमध्ये तसे करारपत्रही झाले. लोंढे यांनी त्यासाठी एलआयसीकडून १६ लाख रुपये गृहकर्ज घेतले. तथापि, संबंधित फर्मने सदनिकेचा ताबा वेळेत दिली नाही. बांधकाम संथ गतीने सुरु असल्याने लोंढे यांनी पुढील हप्ता थांबविला. ग्राहक मंचाकडे दाद मागितली.
फर्मने मंचापुढे बाजू मांडताना कोरोनाचे कारण दिले. २४० पैकी ९१ सदनिकाधारकांनीच पैसे दिले अशीही बाजू मांडली. त्यामुळे तक्रार रद्द करण्याची विनंती केली. मंचाने फर्मचे म्हणणे फेटाळून लावले. लोंढे यांना १९ लाख ९ हजार ६१० रुपयांची भरपाई ३० दिवसांत देण्याचे आदेश दिले. त्यावर १ सप्टेंबर २०१९ पासून साडेआठ टक्के दराने व्याजही देण्यास फर्मावले.
दहा महिन्यात निकाल
मंचाचे अध्यक्ष मुकुंद दात्ये, सदस्य अश्फाक नायकवडी व निलांबरी देशमुख यांनी दाव्यावर निर्णय दिला. लोंढे यांनी १५ जुलै २०२२ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यावर २२ मे २०२३ रोजी म्हणजे १० महिने तीन दिवसांत निर्णय दिला.