वसंतदादा कारखान्याच्या चौकशीचे आदेश
By admin | Published: March 31, 2017 11:35 PM2017-03-31T23:35:19+5:302017-03-31T23:35:19+5:30
अधिकारी नियुक्त; नुकसानीची जबाबदारी निश्चित होणार; प्रादेशिक साखर सहसंचालकांचा दणका
सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यामागील अडचणीत आणखी एका चौकशीची भर पडली आहे. वसंतदादा कारखान्याच्या नुकसानप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्यासाठी सहकार अधिनियम कलम ८८ खाली चौकशी करण्याचे आदेश प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांनी दिले आहेत. या चौकशीसाठी विशेष लेखापरीक्षक आर. बी. वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कारखान्याच्या संचालकांचे धाबे दणाणले आहे.
वसंतदादा साखर कारखाना सध्या अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. आठ दिवसांपूर्वी ५० कोटी रुपयांच्या थकीत कर्जापोटी जिल्हा मध्यवर्ती बँकेने कारखान्याचा प्रतीकात्मक ताबा घेतला आहे. जिल्हा बँकेसह शेतकऱ्यांच्या ठेवी व बिलाचे सुमारे शंभर कोटी, तर कर्मचाऱ्यांचे पगार, भविष्य निर्वाह निधीचे ६० कोटी, बॅँक आॅफ इंडियाने तोडणी व वाहतुकीसाठी दिलेले कर्ज व व्याजासह ६५ कोटी रुपये थकीत आहेत. विक्रीकर विभागाचे १४ कोटी रुपये थकीत आहे. शेतकरी संघटनेने कारखान्याच्या देण्यांबाबत मुख्यमंत्री, सहकारमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. कारखान्यावर प्रशासक नियुक्त करून संचालकांच्या गैरकारभाराच्या चौकशीचीही मागणी केली होती. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीही, शेतकरी व कामगारांची देणी वसूल करण्याबाबत जिल्हा उपनिबंधकांशी पत्रव्यवहार केला आहे. यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याने एक लाखाच्या आसपास गाळप केले आहे. शेतकऱ्यांचे शेवटच्या महिन्यात गाळप केलेल्या उसाचे बिलही अदा केलेले नाही. त्यात जिल्हा बँकेने कारखान्याचा ताबा घेऊन लिलाव अथवा भाडेपट्टीवर देण्याच्या हालचाली गतिमान केल्या होत्या. येत्या आठवडाभरात त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारीही सुरू केली होती.
ही सारी प्रक्रिया सुरू असतानाच प्रादेशिक साखर सहसंचालकांनी वसंतदादा कारखान्याच्या संचालकांना दणका दिला आहे. दोन दिवसांपूर्वी कारखान्याच्या नुकसानीची चौकशी करण्यासाठी कलम ८८ खाली चौकशी अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार विशेष लेखापरीक्षक आर. बी. वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी कारखान्याच्या २०१० ते २०१२ या दोन वर्षातील कारभाराची द्वितीय विशेष लेखापरीक्षक (साखर) डी. एस. खांडेकर यांनी कलम ८३ खाली चौकशी केली होती. या अहवालात त्यांनी कारखान्याच्या कारभाराबाबत ठपका ठेवला आहे. त्यांचा अहवाल आॅक्टोबर महिन्यात प्रादेशिक साखर सहसंचालकांना सादर करण्यात आला होता. त्यानंतर आता सहसंचालकांनी गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशी अधिकारी नियुक्त केला आहे. (प्रतिनिधी)
नोटिशीला केराची टोपली
वसंतदादा साखर कारखान्याच्या २०१० ते २०१२ या दोन वर्षातील लेखापरीक्षणाच्या ८३ खाली चौकशीसाठी द्वितीय विशेष लेखापरीक्षक डी. एस. खांडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. खांडेकर यांनी चौकशीचे काम सुरू केले. त्यासाठी त्यांनी संचालकांना नोटिसा बजाविल्या. लेखी नोटिसा देऊनही संचालक चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. कारखान्याच्या संचालकांकडून चौकशीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर खांडेकर यांनी आपला अहवाल साखर सहसंचालकांना सादर केला. त्यावर आता ८८ खाली चौकशीचे आदेश झाले. संचालकांनी नोटिशीला केराची टोपली दाखविली असली तरी, त्यांच्यामागील चौकशीचा फेरा सुटलेला नाही. आता तर कारखान्याच्या नुकसानीची जबाबदारीच संचालकांवर निश्चित होणार अ