बोरगाव आरोग्य केंद्रातील परिचारिकांच्या चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:27 AM2021-04-27T04:27:34+5:302021-04-27T04:27:34+5:30
इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका या कोरोनाबाधित रुग्णांना चुकीची माहिती देऊन परिस्थिती गंभीर असल्याचे ...
इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका या कोरोनाबाधित रुग्णांना चुकीची माहिती देऊन परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत रुग्णाला हलविण्यासाठी सुचवत असतील, तर ही गंभीर बाब आहे. या परिचारिकांचे बाहेरील रुग्णालये अथवा डॉक्टरांशी संपर्क आहेत का, याची चौकशी करून कारवाई करा आणि त्याचा अहवाल तातडीने द्या, असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी आरोग्य केंद्राच्या मुख्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.
गुरुवारी एका कॉलनीतील महिला रुग्णाची तपासणी करण्यासाठी आलेल्या परिचारिकांनी दोनवेळा दोन वेगवेगळ्या ऑक्सिमीटरवर रुग्णाची ऑक्सिजन पातळी तपासली. मात्र ऑक्सिमीटरवरील ऑक्सिजन पातळी आणि हृदयगतीच्या तपशिलाची माहिती रुग्णाच्या कुटुंबाला दाखविली नाही.
रुग्णाच्या तपासणीसाठी आलेल्या परिचारिकांकडून रुग्णाच्या कुटुंबाला विश्वासात न घेता मनमानी पद्धतीनेच तपासणी केली गेली. हे सर्व झाल्यानंतर रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तीला बाहेर बोलावून, रुग्णाची ऑक्सिजन पातळी ही ८५ ते ८६ इतकी खालीपर्यंत घसरली आहे. ही बाब गंभीर असून रुग्णाला तातडीने ऑक्सिजन बेडची गरज आहे. त्यामुळे पुुढील उपचारासाठी रुग्णाला हलविण्याची सूचना करत, या कुटुंबाला तणावग्रस्त करून टाकले.
संबंधित महिला रुग्णाला श्वसनाचा कोणताही त्रास होत नव्हता. शुक्रवारी त्यांची तपासणी केल्यावर ऑक्सिजन पातळी ही ९४ इतकी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे परिचारिकांनी चुकीची माहिती देत या रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच आरोग्य केंद्रात खळबळ उडाली.
दरम्यान, पालकमंत्री जयंत पाटील यांनी रविवारी आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. चेतना साळुंखे यांना पाचारण करत तेथील कर्मचाऱ्यांचे बाहेरील रुग्णालयांशी संपर्क आहेत का, नागरिकांकडून तशा शंका व्यक्त करणाऱ्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. अशी बाब असेल तर हा गंभीर प्रकार आहे. त्याची चौकशी करून, केलेल्या कारवाईचा अहवाल देण्याचे आदेश डॉ. साळुंखे यांना दिले आहेत.