मिरज पंचायत समितीमधील एजंटांना प्रतिबंधाचे आदेश
By admin | Published: June 17, 2015 11:12 PM2015-06-17T23:12:16+5:302015-06-18T00:40:36+5:30
पिळवणुकीस आळा : ग्रामसेवकांकडून कामांचे प्रस्ताव घेणार--लोकमतचा दणका
मिरज : मिरज तालुक्यात मनरेगाच्या कामांना मंजुरी मिळवून देण्यासाठी एजंटांनी लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक सुरू केल्याच्या ‘लोकमत’च्या वृत्ताची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. मिरज पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना एजंटगीरीला व आर्थिक फसवणुकीला आळा घालण्याच्या व कामांचे प्रस्ताव ग्रामसेवकांच्या माध्यमातून दाखल करुन घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांच्या फसवणुकीबाबत वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर पंचायत समितीत उठबस करणारे एजंट गायब झाले होते.
मिरज तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या गोठा बांधकाम व विहीर मंजुरीसाठी एजंटांनी परस्पर बाजार मांडत लाभार्थ्यांना लाखोचा गंडा घातला आहे. याबाबत ‘लोकमत’च्या या वृत्ताची मनरेगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेत मिरज पंचायत समितीतील रोजगार हमी योजना विभागातील अधिकाऱ्यांना विचारणा केली. संबंधित अधिकाऱ्यांनी फसवणुकीबाबत लाभार्थ्यांकडून तक्रारी येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले.
कामांना मंजुरी मिळवून देण्यासाठी सुरु असलेली एजंटगीरी व त्यांच्याकडून लाभार्थ्यांची होणारी आर्थिक फसवणूक ही गंभीर बाब असल्याने एजंटगीरीला प्रतिबंध करण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या कामांचे प्रस्ताव ग्रामसेवकांच्या माध्यमातून दाखल करुन घ्यावेत व त्यांच्याकडूनच कामांचा पाठपुरावा करण्यात यावा. एजंटांकडून आर्थिक फसवणुकीबाबत प्रकार आल्यास कारवाई करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)