विट्यातील ‘जीवनधारा’ला बिलाचे १२ लाख परत करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:29 AM2021-05-20T04:29:07+5:302021-05-20T04:29:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : विटा नगरपालिकेने सुरू केलेल्या जीवनधारा कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडसाठी जादा रक्कम आकारल्याने ८० रुग्णांकडून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा नगरपालिकेने सुरू केलेल्या जीवनधारा कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडसाठी जादा रक्कम आकारल्याने ८० रुग्णांकडून जादा घेतलेले ११ लाख ८४ हजार रुपये परत करण्याचे आदेश तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी बुधवारी दिले.
येथे साळशिंगे रस्त्यावरील शासकीय निवासी शाळेत नगरपालिकेने जीवनधारा डेडिकेटेड कोविड सेंटर या नावाने ३८ ऑक्सिजन बेडचे रुग्णालय सुरू केले आहे. नगरपालिकेने रुग्णांना बिलात १५ टक्के सवलत दिली आहे. शासनाच्या दरपत्रकाप्रमाणे ऑक्सिजन बेडसाठी प्रतिदिन चार हजार रुपये आकारणे आवश्यक आहे.
परंतु ७५०० रुपये प्रतिदिन घेतल्याचे ऑडिटमधून दिसून आले. रुग्णालय प्रशासनाने ८० रुग्णांना हे बिल देऊन त्यांच्याकडून ११ लाख ८४ हजारांची जादा रक्कम घेतली होती. याचा अहवाल आल्यानंतर तहसीलदार शेळके यांनी जादा घेतलेल्या बिलाची रक्कम संबंधित रुग्णांना परत करावी, अशी नोटीस रुग्णालय प्रशासनाला बजावली. बिलात जादा घेतलेली रक्कम संबंधित रुग्णांना परत देण्याची प्रक्रिया रुग्णालयाने सुरू केली आहे.
चौकट
... तर मी बिल भरायला तयार! : वैभव पाटील
कोणत्याही बिलाचे ऑडिट झाल्याशिवाय रुग्णांना डिस्चार्ज देता येणार नाही, हे तहसीलदारांचे म्हणणे चुकीचे आहे. त्यांनी तसे केले पाहिजे, हे खरे असले तरी ७ मेपर्यंत तसे काहीही झालेले नाही. त्यांचा लेखापरीक्षक कोविड सेंटरमध्ये पूर्णवेळ उपस्थित राहत नाही. खासगी कोविड सेंटरच्या बिलांच्या नियमांबाबत गोंधळाची स्थिती आहे. आमच्या सेंटरमध्ये बिलाबाबत कोणाचीही तक्रार नाही. जर तक्रार असेल तर आजपर्यंतच्या सगळ्या रुग्णांचे पैसे भरायला मी तयार आहे, असे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सांगितले.