वालचंदमधील वादाच्या चौकशीचे आदेश
By admin | Published: June 27, 2016 12:32 AM2016-06-27T00:32:56+5:302016-06-27T00:33:46+5:30
मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप : त्रिसदस्यीय समिती नियुक्त
सांगली : येथील वालचंद महाविद्यालयाच्या मालकी हक्कावरून भाजपचे खासदार व जिल्हाध्यक्षांच्या गटात वाद उफाळला आहे. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीला येत्या दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
वालचंद महाविद्यालयाच्या मालकी हक्कावरून अजित गुलाबचंद यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळ व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीत (एमटीई) वाद निर्माण झाला होता. महिन्याभरापूर्वी पृथ्वीराज देशमुख यांनी वालचंद महाविद्यालयाचा ताबा घेतला होता. नियामक मंडळाने रितसर नेमलेले संचालक डॉ. जी. व्ही. परिशवाड यांची हकालपट्टी करून डॉ. एस. जी. देवमाने यांची नियुक्ती करण्यात आली. चार दिवसांपूर्वी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी महाविद्यालयाचा ताबा पुन्हा परिशवाड यांच्याकडे सोपविला. यावरून खासदार पाटील व जिल्हाध्यक्ष देशमुख या भाजपच्या दोन नेत्यांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्या होत्या.
अखेर मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेत चौकशीसाठी कऱ्हाड येथील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. काडके यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीने दोन्ही गटाला नोटिसा बजावून आपले म्हणणे मांडण्याची सूचना केली आहे. येत्या दहा दिवसांत समितीचा अहवाल शासनाकडे जाणार आहे. दरम्यान, नोटिसा प्राप्त होताच दोन्ही गटांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागवून घेतली आहे. (प्रतिनिधी)