‘माणगंगा’ संस्था सव्वासहा कोटी भरणार
By admin | Published: March 28, 2016 11:43 PM2016-03-28T23:43:05+5:302016-03-29T00:28:18+5:30
जिल्हा बँक सामोपचार योजनेत सहभाग : १४ संस्थांची यादी तयार
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या सामोपचार कर्ज परतफेड योजनेअंतर्गत आटपाडीच्या माणगंगा ऊसतोडणी व वाहतूक संस्थेने ६ कोटी १५ लाख ५६ हजार रुपये भरण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे सामोपचार योजनेतील मोठी वसुली यानिमित्ताने होणार आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर आटपाडीचे नेते राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याशी बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी चर्चा केली. यावेळी सामोपचार योजनेत माणगंगा ऊसतोडणी व वाहतूक संस्थेला लाभ मिळू शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. देशमुखांनी ही रक्कम भरणार असल्याचे सांगितल्याने बँकेला दिलासा मिळाला आहे. या संस्थेचे एकूण ९ कोटी ६१ लाख ६८ हजार रुपये येणे आहेत. माणगंगा कारखान्याच्या भविष्यातील कर्जप्रकरणाचे भवितव्यही ऊसतोडणी व वाहतूक संस्थेच्या या कर्जवसुलीवर अवलंबून आहे. याबाबतची कल्पना प्रशासकांच्या कालावधितही देण्यात आली होती. त्यामुळे आता संस्थेची ही वसुली सामोपचारमधून होण्यची शक्यता आहे.
योजनेअंतर्गत १४ संस्थांची यादी जिल्हा बँकेने तयार केली आहे. या संस्थांची एकूण येणेबाकी ४१ कोटी ६३ लाख ९७ हजार इतकी असून, सामोपचार योजनेतून यातील १६ कोटी ३३ लाख ३९ हजार रुपये वसूल होऊ शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. बँकेची वसुली मोहीम गतीने सुरू असून, सामोपचार योजनेतूनही मोठी वसुली होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
सामोपचार योजनेस पात्र संस्था
संस्था थकित रक्कम
महाराष्ट्र विद्युत औद्योगिक संस्था नेर्ले८ कोटी ८३ लाख ८0 हजार
नेर्ला ग्राहक संस्था ४८ लाख ११ हजार
सदगुरू नागरी पतसंस्था, नेर्ले १४ लाख ९१ हजार
नेर्ला सोया फूडस्३ कोटी ३३ लाख १८ हजार
एस. के. फूडस्, गोटखिंडी७७ लाख ६७ हजार
प्रकाश अॅग्रो, सांगली१३ कोटी ५७ लाख ९३ हजार
माणगंगा ऊसतोडणी संस्था, आटपाडी९ कोटी ६१ लाख ६८ हजार
राजहंस कुक्कुटपालन, साखराळे८७ लाख ४९ हजार
महाराष्ट्र कॅप्सुल, बोरगाव५५ लाख ३६ हजार
जिजामाता गोणी उत्पादक, बुधगाव७ लाख ५७ हजार
वसंतदादा शाबू प्रकल्प१ कोटी ७२ लाख
सुयोग यंत्रमाग, कवठेमहांकाळ१ कोटी २ लाख
ब्रम्हनाथ यंत्रमाग, खंडेराजुरी ५६ लाख ९३ हजार