एसटी वाचविण्यासाठी सामाजिक संघटनांचा पुढाकार : व्हॉटस्-अॅप ग्रुपच्या माध्यमातून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:47 PM2018-10-06T23:47:59+5:302018-10-06T23:50:56+5:30
एसटीचे (गरिबांची लाल परी) खासगीकरण करुन ती भांडवलदारांच्या घशात घालण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे. तो हाणून पाडण्यासाठी एसटीबद्दल प्रेम असणाऱ्या काही सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी ‘एसटी वाचवा’ हा व्हॉटस् -अॅप ग्रुप तयार केला असून, ग्रुपचे अडीचशे सदस्य आहेत.
अशोक डोंबाळे ।
सांगली : एसटीचे (गरिबांची लाल परी) खासगीकरण करुन ती भांडवलदारांच्या घशात घालण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे. तो हाणून पाडण्यासाठी एसटीबद्दल प्रेम असणाऱ्या काही सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी ‘एसटी वाचवा’ हा व्हॉटस् -अॅप ग्रुप तयार केला असून, ग्रुपचे अडीचशे सदस्य आहेत. एसटी वाचविण्यासाठीचे धोरण ठरविण्यासाठी दि. १४ आॅक्टोबर रोजी इस्लामपूर येथे त्यांची पहिली ‘एसटी बचाव परिषद’ आयोजित केली आहे.
एसटीबद्दल सहानुभूती असणाºया काही जागरुक सामाजिक कार्यकर्त्यांनी एसटीसमोरील भविष्यातील समस्या ओळखून दोन महिन्यापूर्वी व्हॉटस्-अॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य कार्याध्यक्ष कॉ. धनाजी गुरव, हमाल माथाडी कामगारांचे नेते विकास मगदूम, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बी. जी. पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह एसटीचे अधिकारी, कर्मचाºयांचाही समावेश आहे.
महाराष्ट्राच्या विकासामध्ये एसटीचे फार मोठे योगदान आहे. ‘गाव तेथे एसटी’ आणि ‘रस्ता तेथे एसटी’ पोहोचल्यामुळे ग्रामीण भागातील मुलांचे उच्च शिक्षण पूर्ण झाले. अन्यथा विशेषत: मुलींचे तर शिक्षणच थांबले असते. केवळ एसटीमुळे ग्रामीण भागातील मुलींना शहरापर्यंत शिक्षणासाठी पोहोचता आले. सामान्य प्रवाशाला शहरापर्यंत जायचे असेल तर, एसटीशिवाय पर्याय नाही. एसटीची सार्वजनिक प्रवासी वाहतूक लढूनच मिळविलेली आहे.
एसटीला लाल डबा म्हणून उच्चशिक्षित कमी लेखत असले तरी, आजही गावाकडील सामान्य गरिबांच्यादृष्टीने ती लाल परीच आहे. ही लाल परीच सध्या आर्थिकदृष्ट्या संकटात सापडली आहे. दिवसेंदिवस तोट्याचा प्रवास चालू आहे. याच तोट्याचा मुद्दा पुढे करुन राज्यकर्त्यांचा एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतूक खासगीकरणाच्या कचाट्यातून वाचविण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘एसटी वाचवा’ हा व्हॉटस्-अॅप ग्रुप तयार केला आहे.
कॉ. धनाजी गुरव म्हणाले की, ग्रामीण भागाच्या विकासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट केली पाहिजे. एसटीच्या लाल रंगाच्या आणि एशियाड बसेसची खरेदीच थांबलेली आहे. शिवनेरी, शिवशाही बसेसच्या माध्यमातून खासगी कंत्राटदारांना जगविण्याचा काही राज्यकर्त्यांचा प्रयत्न चालू आहे. प्रवाशांना चांगली सेवा द्यायची असेल, तर महामंडळानेच दर्जेदार आलिशान बसेस खरेदी कराव्यात. एसटीसमोरील खासगीकरणाचे संकट ओळखूनच एसटी बचाव परिषद दि. १४ आॅक्टोबर रोजी इस्लामपूर येथे घेण्यात येणार आहे.
फायद्यातील ‘हिरकणी’ बस बंद का?
सांगली ते पुणे, सांगली ते कोल्हापूर, सांगली ते सातारा या मार्गावर ‘हिरकणी’ या बसेस फायद्यात चालू होत्या. प्रवाशांचीही येथे गर्दी होती. अपघातही फारसे होत नव्हते. तरीही फायद्यातील ‘हिरकणी’ बंद करुन एसटी महामंडळाने नक्की काय साध्य केले, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. ‘हिरकणी’ बस बंद करुन त्याच मार्गावर शिवशाही बस सुरु केली आहे.
यापैकी बहुतांशी बसेस खासगी कंपनीच्या असून, ठेकेदारास पहिल्या ३०० ते ३४९ किलोमीटर अंतरासाठी प्रति किलोमीटर १९ रुपये ४१ पैसे द्यावे लागत आहेत. त्यानंतर ८०० ते त्यापुढील प्रति किलोमीटरसाठी १३ रुपये ठेकेदाराला महामंडळ देत आहे. ठेकेदाराला देण्यात येणारे भाडे डिझेल सोडून आहे. डिझेलचा खर्च महामंडळावरच आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार या तीन दिवशीच सध्या शिवशाहीला गर्दी असून, उर्वरित दिवशी तोटाच असल्याचे खासगीत प्रशासनाचे अधिकारी सांगत आहेत. हा तोटा महामंडळाला सहन करावा लागत आहे.