संघटना, संस्थांनी जपले सामाजिक भान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:26 AM2020-12-29T04:26:35+5:302020-12-29T04:26:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापुरानंतर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटात जिल्ह्यातील सामाजिक संघटना, संस्थांनी अनेकांना मदतीचा हात दिला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापुरानंतर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटात जिल्ह्यातील सामाजिक संघटना, संस्थांनी अनेकांना मदतीचा हात दिला. विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या या संघटनांनी आरोग्याबाबत जनजागृती करण्यापासून ते ऑक्सिजन, व्हेंटिलेंटरची सुविधा उभी करण्यापर्यंत सहकार्य केले. अनेकांनी तर कोविड सेंटर उभारून रुग्णांना दिलासा दिला. विविध चळवळी, कार्यक्रम, पुरस्कार वितरण यासारख्या उपक्रमापुरत्या मर्यादित असलेल्या अनेक संस्थांनी सामाजिक भान जपल्यानेच कोरोनाच्या संकटाशी दोन हात करणे प्रशासनाला शक्य झाले.
नागरिक जागृती मंच, आयुष सेवाभावी संस्था यासारख्या शेकडो संघटनांनी कोरोनाच्या काळात ऑक्सिजन यंत्रे विकत घेऊन ती रुग्णांना मोफत दिली. भारतीय जैन संघटना, मुस्लिम समाज, मराठा समाजासह सर्वच समाजातील संघटना, संस्थांनी एकत्र येत कोविड सेंटर उभारली. त्यामुळे कोरोना संसर्गात रुग्णांना बेड मिळाले होते. मदनभाऊ युवा मंच व इतर काही संघटनांनी कोविड सेंटरसाठी लागणारी उपकरणे उपलब्ध करून दिली. मास्क, सॅनिटायझरच्या वाटपापासून ते रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक संघटना धडपडत होत्या. मुस्लिम संघटनेने तर मृत कोविड रुग्णांवर दफनविधीची जबाबदारी स्वीकारली होती.
लाॅकडाऊनच्या काळात अनेक संघटनांनी गोरगरीब व गरजूंना धान्य, भाजीपाल्याचे वाटप केले. कित्येक ट्रस्ट, मंडळे या कामासाठी दिवस-रात्र मेहनत घेत होती. सामाजिक संघटना, संस्थांच्या योगदानाची यादीही भली मोठी आहे. कन्टेनमेंट झोनमध्ये नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठीही काही संघटना कार्यरत होत्या. कोरोनामुळे या संघटनांच्या कार्याचा विस्तारही झाला. यापूर्वी आरोग्य यंत्रणेत फारसे योगदान नसणाऱ्या सामाजिक संघटना कोरोनाच्या काळात मात्र मदतीसाठी आघाडीवर होत्या. सामाजिक भान जपत या संघटनांनी केलेल्या सहकार्यामुळे प्रशासनावरील भारही हलका झाला.