सांगलीत बेकायदा बैलगाडी शर्यतीचे आयोजन, १६ जणांवर गुन्हा दाखल; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
By शीतल पाटील | Published: January 17, 2023 11:11 PM2023-01-17T23:11:53+5:302023-01-17T23:12:40+5:30
याप्रकरणी आयोजक आणि बैलगाडी मालकांसह १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील विमानतळाच्या मोकळ्या जागेवर सोमवारी पहाटे बेकायदेशीर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून २ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आयोजक आणि बैलगाडी मालकांसह १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयोजक अक्षय खोत, भोला भोरे, रहमान नजीर पाटील (वय २९ रा. नांगोळे ता. कवठेमहांकाळ), अमीर बादशाह शेरेकर (२८ रा. बुधगाव), निलेश सुरेश चव्हाण (२८ रा. कांचनपूर), रामचंद्र विलास कोळेकर (१९ रा. नांगोळे, ता. कवठेमहांकाळ) यांच्यासह अनोळखी दहा बैलगाडा मालक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सहायक पोलिस फौजदार सुदर्शन वाघमोडे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की कवलापूर गावाजवळ असणाऱ्या कवलापूर नियोजित विमानतळ परिसरात संशयित अक्षय खोत आणि भोला भोरे या दोघांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. शर्यती घेण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची कसलीही परवानगी काढली नव्हती. काल सकाळी सहाच्या सुमारास विमानतळ मैदानावर या बैलगाड्या शर्यती सुरु झाल्या. या शर्यतीत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बैलगाडा मालक दाखल झाले होते. सांगली ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने त्याठिकाणी धाव घेत छापा टाकला.
यावेळी काहीजणांनी पळ काढला. तर याठिकाणाहून पोलिसांनी छोटा हत्ती टेम्पो, तीन मोटारसायकल, दहा वेगवेगळ्या रंगाच्या शर्यतीच्या बैल गाड्या असा एकूण दोन लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून प्राण्यांच्या शर्यतीची परवानगी न घेता शर्यतीचे आयोजन करून प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.