जिल्ह्यात निसर्ग साहित्य संमेलनाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:18 AM2021-07-19T04:18:00+5:302021-07-19T04:18:00+5:30
सांगली : निसर्गप्रेमी, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथमच निमंत्रितांचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती निसर्गरंग फाऊंडेशनचे संस्थापक ...
सांगली : निसर्गप्रेमी, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथमच निमंत्रितांचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती निसर्गरंग फाऊंडेशनचे संस्थापक कुलदीप देवकुळे यांनी दिली आहे.
देवकुळे यांनी सांगितले की, ‘निसर्गराया भेटूया, चला विठ्ठल पेरूया’, ही संकल्पना घेऊन गेली पाच वर्षे सांगलीकर सांस्कृतिकप्रेमींची सायकलवारी आषाढीनिम्मित पंढरपुरी जात असते. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १९ जुलै रोजी जिल्ह्यातच पर्यावरण जनजागृती सायकलवारी व २० जुलै रोजी निसर्गरंग साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संपूर्ण संमेलनाचे फेसबुकवरून थेट प्रसारण केले जाईल. तासगाव तालुक्यातील पेड येथे हे संमेलन होणार असून, यावेळी उद्घाटक, परिसंवाद, कवी संमेलन या तिन्ही कार्यक्रमांच्या सत्रात अध्यक्ष म्हणून महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून काष्ठशिल्पकार, निसर्गचित्रकार, साहित्यिक अशोक जाधव, तर स्वागताध्यक्ष म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे हे उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनाचे उद्घाटन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते होणार आहे, तर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे विशेष निमंत्रित म्हणून संबोधित करणार आहेत.
संमेलनस्थळाला सुंदरलाल बहुगुणा नगरी नाव देण्यात आले आहे. तसेच विचारपीठाला प्राचार्य पी. बी. पाटील यांचे देण्यात आले नाव असून, प्रवेशद्वाराला स्वा. सै. किसनराव आनंदराव पाटील प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले आहे. सायकल रॅलीची सुरुवात १९ जुलैला विष्णुदास भावे नाट्यगृहातून सकाळी साडेसात वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.