अन्य आरक्षणांना सरकारमधील काहींचा विरोध : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:26 PM2017-11-30T13:26:55+5:302017-11-30T13:35:43+5:30

मराठा, पाटीदारांसह अन्य विविध समाजांना आरक्षण देऊन आरक्षणाचा कोटा ७५ टक्क्यांपर्यंत नेण्यास सरकारमधील काहींचा विरोध आहे. तरीही पंतप्रधानांसमोर ही गोष्ट मांडून माझ्या कालावधित आरक्षणाचा कोटा वाढविणारच, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

Others oppose some reservation in the government: Ramdas Athavale | अन्य आरक्षणांना सरकारमधील काहींचा विरोध : रामदास आठवले

अन्य आरक्षणांना सरकारमधील काहींचा विरोध : रामदास आठवले

Next
ठळक मुद्देपश्चिम महाराष्ट्रात दलितांवर कमी अन्यायदलितांवरील आत्याचारात महाराष्ट्र आठवामहायुती तुटली तर नुकसान!कोथळे प्रकरणी तपास योग्य दीशेनेगुजरातमध्ये कॉंग्रेसचा टक्का वाढेल!

सांगली : मराठा, पाटीदारांसह अन्य विविध समाजांना आरक्षण देऊन आरक्षणाचा कोटा ७५ टक्क्यांपर्यंत नेण्यास सरकारमधील काहींचा विरोध आहे. तरीही पंतप्रधानांसमोर ही गोष्ट मांडून माझ्या कालावधित आरक्षणाचा कोटा वाढविणारच, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

अनेक राज्यांमध्ये आता विविध समाजघटकांकडून आरक्षणाची मागणी होत आहे. या सर्वांना समावून घेण्यासाठी राज्य शासनांनी निर्णय घेऊन काहीच उपयोग होणार नाही. न्यायालयातसुद्धा आरक्षणाचे हे निर्णय टिकणार नाहीत. कारण कायद्यातील तरतुदीनुसार आरक्षणाचा कोटा ५0 टक्क्यांवर जाऊ देता येत नाही. त्यामुळेच संसदेत यासंदर्भातील ठराव करण्याची गरज आहे.

कायद्यात बदल करून आरक्षणाचा कोटा ५0 वरून ७५ टक्क्यांपर्यंत नेण्याचा माझा विचार आहे. याबाबत सत्ताधारी पक्षाच्या बैठकीत हा विषय मी उपस्थित केला होता. काहींचा या प्रस्तावाला विरोध आहे. बाकींचा कसाही विचार असला तरी मी पदावर असेपर्यंत आरक्षणाचा हा विषय मार्गी लावणार.


मराठा समाजात सगळेच श्रीमंत नाहीत. या समाजातील गरिबीही मी पाहिली आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण मिळावे, असे माझे ठाम मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच अशा गोष्टींबाबत सकारात्मक असतात. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आरक्षणाचा प्रश्न सुटेल.

पाटीदार समाजाच्या आरक्षणाचाही प्रश्न मोदीच सोडवू शकतील. कॉंग्रेसला आरक्षण द्यायचे असते तर ते त्यांनी कधीच दिले असते. त्यामुळे हार्दिक पटेलांनी माझ्याशी संपर्क साधावा. भाजप आणि त्यांच्यात मध्यस्थी करण्यास मी तयार आहे.


खात्यांतर्गत झालेल्या कामांची माहिती देताना आठवले म्हणाले की, सध्यस्थितीत देशात २ कोटी ६८ लाख ५५ हजार दिव्यांग आहेत. अपंगांना दिव्यांग म्हणून संबोधण्याचा निर्णयही मोदींनीच घेतला.

आजअखेर ८ लाखांहून अधिक अंपगांना ३५0 कोटींच्या वेगवेगळ््या साहित्याचे वाटप करण्यात आले. वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या मागासवर्गीय विद्यार्र्थ्यांना वार्षिक ६0 हजार रुपये देण्याचाही निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पश्चिम महाराष्ट्रात दलितांवर कमी अन्याय

आठवले म्हणाले की, विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रात दलितांवरील आत्याचाराचे प्रमाण कमी आहे. सांगली जिल्ह्यात वर्षभरात अ‍ॅट्रॉसिटीच्या ३३ गुन्ह्यांची नोंद झाली. हा कायदा सामाजिक एकोपा टिकावा म्हणूनच झाला आहे. त्यामुळे याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न मागासवर्गीय लोकांनी करू नये.


दलितांवरील आत्याचारात महाराष्ट्र आठवा

आठवले म्हणाले की, दलितांवरील आत्याचाराची आकडेवारी पाहता उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर आणि त्याखालोखाल बिहार, राजस्थान यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्र याबाबतीत आठव्या क्रमांकावर आहे. सरकार कोणाचेही असले तरी दलितांवरील आत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. त्यामुळे दलितांच्या संरक्षणासाठी आमचा संघर्ष चालूच राहिल.

गुजरातमध्ये कॉंग्रेसचा टक्का वाढेल!

गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत आठवले म्हणाले की, याठिकाणी कॉंग्रेसचा टक्का वाढेल, पण सत्ता भाजपचीच येईल. हार्दिक पटेल यांनी जरी कॉंग्रेसला पाठींबा दिला असला तरी त्यांच्यामागे सर्वच पाटीदार समाज आहे, असे नाही. त्यामुळे भाजपची याठिकाणची सत्ता अबाधित राहिल.

महायुती तुटली तर नुकसान!

राज्यातील भाजप, शिवसेना आणि रिपाइं यांची महायुती टिकायला हवी. शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडू नये किंवा भाजपशी नाते तोडू नये. हे तिन्ही पक्ष वेगवेगळे झाले तर सर्वांचेच नुकसान होईल. त्यामुळे युती अभेद्य रहावी, यासाठी माझे प्रयत्न राहतील, असे आठवले यावेळी म्हणाले.

कोथळे प्रकरणी तपास योग्य दीशेने

सांगलीतील कोथळे खूनप्रकरण राज्यातील पोलिस दलाला काळीमा फासणारे आहे. थर्ड डिग्रीचा वापर करणाऱ्या पोलिसांना खात्यात ठेवूच नये, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत, असे आठवले म्हणाले. कोथळे प्रकरणी सुरू असलेला सीआयडी तपास योग्य दिशेने सुरू आहे. त्यामुळे कोथळे कुटुंबियांनीही थोडे सबुरीने घ्यावे. राजकीय पद्धतीने मागण्या करणे योग्य नाही, असे आठवले म्हणाले.

Web Title: Others oppose some reservation in the government: Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.