...अन्यथा उद्धव ठाकरेंनी सत्ता सोडावी : रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 10:20 AM2020-02-26T10:20:19+5:302020-02-26T10:20:27+5:30
हे सरकार येत्या तेरा दिवसांत पडेल, असे भाकित भाजप नेते नारायण राणे यांनी केले आहे. कदाचित हे भविष्य खरे ठरेल, असे मला वाटते. तर देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री असल्याने तेसुद्धा याची प्रतीक्षा करीत असल्याचेही आठवले म्हणाले.
सांगली : तेरा दिवसांत सरकार पडेल, असे भाकित नारायण राणे यांनी केले आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या गोष्टीची वाट पाहात आहेत. कधी सरकार पडेल आणि कधी मी मुख्यमंत्रिपदावर विराजमान होईन, याची प्रतीक्षा त्यांना लागली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळावीत, अन्यथा सत्ता सोडावी, असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
बहुजन समता पार्टीच्यावतीने सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात मेळावा पार पडला. यावेळी आठवले म्हणाले की, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक होण्यासाठी मागील भाजप सरकारने शंभर कोटींचा निधी जाहीर केला होता. आता सरकार महाविकास आघाडीचे आले आहे. त्यामुळे निधी अडचणी येत आहेत. हे सरकार येत्या तेरा दिवसांत पडेल, असे भाकित भाजप नेते नारायण राणे यांनी केले आहे. कदाचित हे भविष्य खरे ठरेल, असे मला वाटते. तर देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री असल्याने तेसुद्धा याची प्रतीक्षा करीत असल्याचेही आठवले म्हणाले.
तर मिरज येथे दुसरी अखिल भारतीय बौध्द धम्म महापरिषद पार पडली असून, यावेळी बोलताना आठवलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ठाकरे सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करतो म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य पद्धतीने केली नसल्याने राज्यभर सुरु असलेल्या भाजपच्या आंदोलनास माझा पाठींबा आहे. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळावीत, अन्यथा सत्ता सोडावी असा खोचक टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.