आमचे सरकार दिल्लीपुढे नाही झुकणार; नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 05:23 AM2020-01-18T05:23:26+5:302020-01-18T05:23:46+5:30
एवढे नीटनेटके कार्यालय राज्यात किंवा देशात नसेल. शेतकºयांच्या कर्जमुक्तीचा शब्द दिला होता, तो सत्तेत आल्यानंतर पूर्ण केला आहे.
इस्लामपूर (जि. सांगली) : चार महिन्यांपूर्वी युतीत होतो. शिवसेनेची सोबत होती, म्हणूनच केंद्रात भाजपचे सरकार आले. केंद्राचे सरकार देशाचे पालक असते. महापुरासह अस्मानी संकटाने प्रचंड नुकसान झाले. अशावेळी पालक म्हणून मदत करण्याऐवजी ते त्याला नकार देत आहेत. मात्र आम्ही पडेल ती किंमत मोजून शेतकºयाला मदत करू. यासाठी दिल्लीपुढे झुकणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला.
इस्लामपूर येथील महसूल विभागाच्या नूतन तहसील कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्याहस्ते झाले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. जलसंपदामंत्री जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते.
ठाकरे म्हणाले की, एवढे नीटनेटके कार्यालय राज्यात किंवा देशात नसेल. शेतकºयांच्या कर्जमुक्तीचा शब्द दिला होता, तो सत्तेत आल्यानंतर पूर्ण केला आहे. आता दोन लाखांवरील कर्ज आणि नियमित शेतीकर्ज फेडणाºया शेतकºयांनाही दिलासा देणार आहोत. देशाची अर्थव्यवस्था कोमात गेल्याचे अर्थतज्ज्ञ सांगतात. ती कोणामुळे गेली हे सर्वांना माहीत आहे. आता तिला बाहेर काढण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. रोजगार निर्मितीसाठी उद्योगधंद्यांचे जाळे विस्तारायला हवे. देशातील सर्वात मोठे उद्योगपती महाराष्ट्रातील मुंबईत राहतात. त्यामुळे रोजगार निर्मितीच्या प्रयत्नांना लवकरच यश येईल.
जलसंपदामंत्री पाटील म्हणाले , राजारामबापूंच्या पुण्यतिथीदिनी विधायक कामे सुरू करण्याची आमची परंपरा आहे. भविष्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा भविष्य घडविणारी आमची पिढी या तालुक्यात निर्माण झाली आहे. दोन-अडीच वर्षांपूर्वी इमारत तयार होऊनही तिचा वापर होत नव्हता. त्यामुळे कोणाच्याहस्ते उद्घाटन करून घ्यायचे, हे इमारतीनेच ठरवले होते. त्याला मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांचे हात लागले.