६९९ गावांपैकी तीन गावांमध्येच मीटरने पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 11:17 PM2018-06-01T23:17:17+5:302018-06-01T23:17:17+5:30
अशोक डोंबाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील १३ मोठ्या शहरांपैकी सात शहरात आणि ६९९ गावांपैकी केवळ तीन गावांमध्येच मीटरने पाणी दिले जात आहे. उर्वरित शिराळा, पलूस, कडेगाव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या शहरांसह ६९६ गावांमध्ये आजही मीटरने पाणी दिले जात नाही. तसेच बारा प्रादेशिक योजनांच्या कार्यक्षेत्रात ५८ हजार २८५ कुटुंबांपैकी २५ हजार ७७ कुटुंबांकडेच पाणी कनेक्शन्स असून उर्वरित कुटुंबे घेत असलेल्या पाण्याचा हिशेबच होत नाही.
जिल्ह्यात ३७ प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागाची तहान भागविली जात आहे. यापैकी १७ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषद चालवित असून सध्या ११ योजना केवळ वीज बिल थकीत असल्यामुळे बंद आहेत. त्याला पूरक सावळज (ता. तासगाव) योजना २०१४, तर आरग-बेडग, बेळंकी (ता. मिरज) योजना २००७ पासून बंद आहे. येळावी (ता. तासगाव), रायगाव (ता. कडेगाव), वाघोली (ता. कवठेमहांकाळ), नांद्रे-वसगडे (ता. पलूस), मणेराजुरी-कवठेमहांकाळ-विसापूर या पाच योजनांचा वीजपुरवठा मार्चपासून खंडित असल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती चालू आहे. पेड (ता. तासगाव) ही योजना आॅगस्ट २०१६ पासून तलावात पाणी नसल्याने बंद आहे. यापैकी बहुतांशी प्रादेशिक योजना ३० ते ३५ वर्षांपूर्वीच्या जुन्या असल्यामुळे त्यांच्या पाईपलाईनला गळती आहे. जलशुध्दीकरणासह पंपिंग यंत्रसामग्री कालबाह्य झाल्यामुळे तीही बदलण्याची गरज आहे. या योजना दुरुस्तीसाठी जवळपास शंभर ते सव्वाशे कोटींच्या निधीची गरज आहे.
याशिवाय, १९ पाणी पुरवठा योजना शिखर समिती आणि ग्रामपंचायती चालवत आहेत. यापैकीही किल्लेमच्छिंद्रगड, बहे (ता. वाळवा), माधवनगर (ता. मिरज), सावळज (ता. तासगाव), पणुंब्रेतर्फ वारुण, रिळे, कांदे, येळापूर (ता. शिराळा), नेर्ली, नेवरी (ता. कडेगाव) येथील पाणी पुरवठा योजना तीन ते चार वर्षापासून बंद आहेत. कोणतीही तांत्रिक वस्तुस्थिती जाणून न घेता राजकीय दबावामुळे स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांना मंजुरी दिल्यामुळे कोट्यवधीच्या योजना सध्या बंद पडल्या आहेत. याला राजकीय अनास्था आणि अधिकाऱ्यांची चुकीची धोरणेच जबाबदार आहेत. पूर्वी चार ते दहा गावांसाठी एक योजना केली होती. यामधून अनेक गावे बाहेर पडल्यामुळे मोठ्या योजनांचा बोजा छोट्या गावांवर पडल्यामुळे त्यांच्या खिशाला योजनेचे पाणी परवडत नसल्याचे दिसत आहे.
योजना केल्यानंतर कुटुंबांना पाणी कनेक्शन घेण्याची सवयच लावली नसल्यामुळे पाण्याचा बेकायदेशीर वापर वाढला आहे. जिल्हा परिषदेच्या ताब्यात १२ प्रादेशिक योजनांच्या कार्यक्षेत्रात ८८ गावांमध्ये ५८ हजार २८५ कुटुंब संख्या असताना, केवळ २५ हजार ७७ नळ जोडण्या आहेत. ३३ हजार २०८ कुटुंबियांकडे पाणी कनेक्शनच नाहीत. सार्वजनिक नळातूनच पाण्याचा वापर होत आहे. याहीपेक्षा धक्कादायक प्रकार म्हणजे, जिल्ह्यातील ६९९ गावांपैकी केवळ वाळवा तालुक्यातील बिचूद, येडेनिपाणी व मिरज तालुक्यातील हरिपूर या गावामध्येच नागरिकांना मीटरने मोजून पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा लेखाजोखा...
योजनेचे नाव गावे कुटुंबे नळ जोडण्या थकीत पाणीपट्टी सद्यस्थिती
कासेगाव मूळ ७ ६४१७ ३००० ३५१४७९२८ नूतनीकरण सुरु
कासेगाव नवीन ७ ३८६९ १९९९ नूतनीकरण सुरु
नवेखेड-जुनेखेड २ १०४१ ७८९ ३७७१२९४ योजना सुरळीत सुरु
तुंग-बागणी ४ १४१२ ११४५ ४८१३७४७ दुरुस्तीची गरज
वाघोली ३ ३८३ १०३ ५८८१९९ योजना बंद
नांद्रे-वसगडे ५ १५४० ११५१ १५१८०४५६ दुरुस्तीची गरज
मणेराजुरी/
कवठेमहांकाळ/ ३१ २१०८७ ६३३८ २१५४३१२१ योजना बंद
विसापूर
पेड ५ ३६८३ १३६१ ४६०२३७९ योजना बंद
येळावी ९ ४७२० १२३७ २६८८९९५ योजना बंद
कुंडल १४ ३९४७ ७८८७ २८२२०९६२ दुरुस्तीची गरज
एकूण ८८ ५८२८५ २५०७७ ११७०५१४९०