वारणा पात्राबाहेर, कृष्णा इशारा पातळीकडे; सांगलीत कृष्णेची पाणीपातळी ३४ फुटांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 12:22 PM2024-07-26T12:22:47+5:302024-07-26T12:23:08+5:30
२७ रस्ते आणि १५ पूल पाण्याखाली गेल्यामुळे दोन गावांतील संपर्क तुटले
सांगली : धरण क्षेत्रात मुसळधार, तर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. कोयना धरण ७४.३८ टक्के भरल्यामुळे धरणातून गुरुवारी सायंकाळी ७ वाजता २१ हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून, सांगली आर्यविन पूल येथे पातळी ३४ फुटांवर गेली आहे. वारण धरण ८८ टक्के भरल्यामुळे तेथूनही १० हजार ४६० क्युसेकने विसर्ग केला जात आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर, तर कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. नदीकाठची कुटुंबे, पशुधनाचे स्थलांतर सुरू आहे.
जिल्ह्यासह धरण क्षेत्रात गेल्या सहा दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. शिराळ्यात चोवीस तासांत ५०.१ मिलिमीटर, तर चरण परिसरात १२८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या ठिकाणी ढगफुटीसदृश असाच पाऊस झाला आहे. वाळवा, मिरज, पलूससह दुष्काळी कडेगाव, खानापूर, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातही संततधार पाऊस सुरू आहे. कृष्णा, वारणा, येरळा, अग्रणी नद्या, ओढ्यासह नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे २७ रस्ते आणि १५ पूल पाण्याखाली गेल्यामुळे दोन गावांतील संपर्क तुटले आहेत.
वारणा धरणातून विसर्ग सुरू केल्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठची पिके पाण्याखाली गेली असून, कुटुंबीयांनी तेथून पशुधन हलविले आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी गुरुवारी दिवसभरात अडीच फुटांनी वाढून सायंकाळी सांगली आर्यविन पूल येथे ३३ फुटांवर गेली आहे. सांगली, मिरज शहरांतील उपनगरांमध्ये कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे. या परिसरातील १८६ लोकांचे महापालिका प्रशासनाने स्थलांतर केले आहे.
जिल्ह्यात २०.५ मिलिमीटर पाऊस
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, शिराळा तालुक्यात सर्वाधिक ५०.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे - मिरज १५.४ (३८४.३), जत ४.७ (२६७.२), खानापूर १९.८ (३१८.१), वाळवा २७.५ (५९०.६), तासगाव १९ (३८३.८), शिराळा ५०.१ (८४७.३), आटपाडी ९ (२४०.४), कवठेमहांकाळ ७.३ (३६०.७), पलूस २४ (४१२.२), कडेगाव २६.१ (४०९.२).
जिल्ह्यातील पाणीपातळी
पाणी पातळी - फूट इंचामध्ये
कृष्णा पूल कऱ्हाड २३.०३
बहे पूल ११.०९
ताकारी पूल ३७
भिलवडी पूल ३५.०६
आयर्विन ३३
राजापूर बंधारा ४६.०३
राजाराम बंधारा ४३.०४
११० नागरिक, ७६३ पशुधनाचे स्थलांतर
वारणा नदीपात्रात पाणी वाढत असल्याने संभाव्य पूरस्थितीचा धोका असलेल्या वाळवा तालुक्यातील भरतवाडी, कणेगाव व शिराळ्यातील देववाडी, चिकुर्डे या गावांतील नागरिकांचे स्थलांतर केले आहे. शिराळा तालुक्यातील ५७ ग्रामस्थांचे आणि ६७७ जनावरांचे, तर वाळवा तालुक्यातील ५३ ग्रामस्थ आणि ८३ जनावरे अशा ११० ग्रामस्थांचे आणि ७६३ जनावरांचे स्थलांतर केले आहे. जिल्ह्यातील १०४ गावांना पुराचा धोका असल्यामुळे प्रशासन त्याठिकाणी अलर्ट आहे.