शालाबाह्य मुलांना आणणार शिक्षणाच्या प्रवाहात ! : शिक्षकांचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:52 PM2019-12-31T23:52:49+5:302019-12-31T23:52:56+5:30
अनेक पालकांचा पालिका शाळांकडे बघण्याचा कल अजूनही बदलला नाही. मात्र, आता हे चित्र बदलू लागले आहे. सातारा शहरात पालिकेच्या एकूण अठरा शाळा आहेत. या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम सुरू झाले आहेत. उच्च शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहे. सेमी इंग्रजी व प्ले ग्रुपचे वर्ग सुरू झाल्याने पटसंख्येत वाढ होऊ लागली आहे.
सचिन काकडे ।
सातारा : गरिबीचे चटके सोसणाऱ्या कुटुंबातील अनेक मुलांना आज शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी अशा मुलांना मग मिळेल ते काम करावं लागतं अथवा दुसऱ्यांपुढे हात पसरावे लागतात. अशा शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबरोबरच पालिका शाळांचा भौतिक, गुणात्मक विकास साधण्यासाठी नववर्षात सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार ज्ञानेश्वर कांबळे व अजित बल्लाळ या शिक्षकांनी केला आहे.
ज्ञानेश्वर कांबळे हे पालिकेच्या ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर शाळा क्रमांक २ तर अजित बल्लाळ हे ज्ञानदीप विद्यामंदिर शाळा क्रमांक १६ मध्ये कार्यरत आहेत. गेल्या पाच वर्षांत ज्ञानेश्वर कांबळे यांनी फूटपाथ व रस्त्यावर, बसून व्यवसाय करणाºया परप्रांतीय तसेच झोपडपट्टीतील सुमारे ४५ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. तर अजित बल्लाळ यांनी भंगार वेचणाºया मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. नववर्षात या शिक्षकांनी अशा शालाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा निर्धार केला आहे.
अनेक पालकांचा पालिका शाळांकडे बघण्याचा कल अजूनही बदलला नाही. मात्र, आता हे चित्र बदलू लागले आहे. सातारा शहरात पालिकेच्या एकूण अठरा शाळा आहेत. या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम सुरू झाले आहेत. उच्च शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहे. सेमी इंग्रजी व प्ले ग्रुपचे वर्ग सुरू झाल्याने पटसंख्येत वाढ होऊ लागली आहे.
पालिका शाळा हळूहळू कात टाकू लागल्या असून, विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासही होऊ लागला आहे. गुणवत्तेचा हा आलेख वाढविण्यासाठी शाळांमध्ये ई-लर्निंग क्लास सुरू करणे, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे, स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर विद्यार्थ्यांच्या शालेय स्तरावर परीक्षा घेणे असे उपक्रम या वर्षात राबविणार असल्याचे पालिकेचे शिक्षक ज्ञानेश्वर कांबळे व अजित बल्लाळ यांनी सांगितले. हे करीत असतानाच शिक्षणापासून भरकटत चाललेल्या तसेच शालाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धार या शिक्षकांनी केला आहे. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत.
पालकांचा पालिका शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलत चालला आहे. सेमी इंग्रजी, प्ले ग्रुपचे वर्ग आता या शाळांमध्येही सुरू झाले आहेत. आतापर्यंत अनेक शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. हा उपक्रम अविरतपणे सुरूच राहणार आहे.
- ज्ञानेश्वर कांबळे, शिक्षक, ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर, शाळा क्र. २
विद्यार्थ्यांना बौद्धिक व गुणात्मक विकास करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ई-लर्निंग क्लासमुळे बऱ्याच अडचणी संपुष्टात आल्या आहेत. खासगी व इंग्रजी माध्यमिक शाळांच्या तुलनेत आता पालिका शाळाही कोणत्याच बाबतीत मागे नाहीत.
- अजित बल्लाळ, शिक्षक, ज्ञानदीप विद्यामंदिर, शाळा क्र. १६