शिराळा, कोकरूडमध्ये बाह्यरुग्ण तपासणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:52+5:302021-05-29T04:20:52+5:30
शिराळा : येथील उपजिल्हा रुग्णालय व कोकरूड ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारपासून बाह्यरुग्ण तपासणी सुरू करण्याचे आदेश तहसीलदार गणेश शिंदे यांनी ...
शिराळा : येथील उपजिल्हा रुग्णालय व कोकरूड ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारपासून बाह्यरुग्ण तपासणी सुरू करण्याचे आदेश तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिले. उपजिल्हा रुग्णालयात १०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.
कोविड रुग्णालय सुरू झाल्यापासून या दोन्ही रुग्णालयांत बाह्यरुग्ण तपासणी बंद करण्यात आली होती. यामुळे कोरोनाव्यतिरिक्त इतर रुग्णांना उपचार मिळत नव्हते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ही माहिती व तक्रारी मिळाल्यावर त्यांनी ही सेवा सुरू करण्याबाबत सूचना केल्या होत्या.
उपजिल्हा रुग्णालयात ७५ ऑक्सिजन बेड होते. आमदार मानसिंगराव नाईक यांनी स्वखर्चाने २५ बेडचे सर्व साहित्य दिले होते. त्यामुळे येथे १०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था झाली होती. मात्र ती अद्याप सुरू करण्यात आली नव्हती. आता येथे १०० ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्यात आले आहेत. याचबरोबर कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना उपचार व परिस्थितीबाबत माहिती मिळावी यासाठी नागरिकांसाठी मदत कक्ष तात्काळ कार्यान्वित करणे, सर्वप्रकारच्या चाचण्या, तपासण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करणे, उपजिल्हा रुग्णालयात १७ वैद्यकीय अधिकारी तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ड्युटी चार्ट तयार करणे, फेवर क्लिनिक सुरू करण्यात यावे, असा आदेश देण्यात आला आहे.
कोट
शिराळा येथील जुन्या इमारतीमध्ये बाह्यरुग्ण तपासणी सुरू करण्यात येणार आहे. या रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मृत्यू प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने गंभीर रुग्णांना वेळेत पुढे उपचारासाठी दाखल करण्यासाठी नियोजन करणे, सर्व रुग्णांची परिस्थिती कशी आहे, याचा अहवाल दररोज सादर करणे आदी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. - गणेश शिंदे, तहसीलदार, शिराळा