दोन लाखावरील थकबाकी ५१.५३ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 03:42 PM2019-12-27T15:42:05+5:302019-12-27T15:43:33+5:30
सांगली : दोन लाखापेक्षा जादा थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याचे सुतोवाच राज्य सरकारने केले आहे. ही कर्जमाफी झाल्यास जिल्हा ...
सांगली : दोन लाखापेक्षा जादा थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याचे सुतोवाच राज्य सरकारने केले आहे. ही कर्जमाफी झाल्यास जिल्हा बॅँकेकडील ४ हजार ८१५ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून, त्यांची थकबाकी ५१.५३ कोटी रुपये आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन लाख रूपयांचे पीककर्ज माफीची घोषणा केली. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी, शेतकºयांचे दोन लाखांपेक्षा जास्त रकमेचे पीककर्जही सरकार माफ करणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे आता या शेतकºयांना कर्जमाफीच्या घोषणेची प्रतीक्षा लागली आहे.
शासनाने जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५२ हजार ७१४ शेतकरी दोन लाखापर्यंतच्या पीककर्ज माफीला पात्र ठरत आहेत. त्यांची थकबाकी ५८३ कोटी ३५ लाख रुपये आहे. शासनाच्या कर्जमाफीच्या आदेशात पीककर्ज असा उल्लेख आहे.
मात्र ते अल्प, मध्यम व दीर्घ मुदत यापैकी कोणाला कर्जमाफीचा लाभ मिळणार, याच्या स्पष्ट सूचना अद्याप बँकांना आलेल्या नाहीत. पीक कर्जाचा उल्लेख असल्याने केवळ अल्प मुदतीचे पीक कर्जच माफ होणार असल्याचे सरकारी व बँकांच्या सूत्रांनी सांगितले.
यात जिल्ह्यातील ५२,७१४ शेतकरी पात्र ठरतील. त्यांचे ५८३.५३ कोटींचे थकीत कर्ज माफ होईल. जिल्हा बॅँकेचे दोन लाखावरील थकीत कर्जदार शेतकरी ४ हजार ८१५ आहेत. त्यांची एकूण थकबाकी ५१ कोटी ५३ लाख रुपये आहे.
यात अल्प मुदतीचे २७९८ शेतकऱ्यांचे ३०.७० कोटी, मध्यम मुदतीचे १२०४ शेतकऱ्यांचे १३.०१ कोटी, तर दीर्घ मुदतीच्या ८१३ शेतकऱ्यांचे ७.८१ कोटींचे कर्ज थकीत आहे. दोन लाखावरील कर्जमाफीचा निर्णय झाल्यास या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.